Thu, Nov 15, 2018 01:04होमपेज › Satara › एस.टी भाडेवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले

एस.टी भाडेवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 8:43PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने  शुक्रवारी मध्यरात्रीपासून 18 टक्के भाडेवाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. गरिबांचा रथ समजला जाणार्‍या  लालपरीचा प्रवास महागला असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी अमोल गुजर म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाने कर्मचारी आणि डिझेल दरवाढ हा विषय लक्षात घेऊन सरासरी 18 टक्के भाडेवाढ केली आहे. यामुळे आम्हा कॉलेज विद्यार्थ्यांचा पाससुद्धा वाढणार आहे. त्यामुळे पॉकेटमनीही आता कमी होणार आहे. सरकारने मुलींना पास सवलत आहे तशी मुलांनाही द्यावी नाही. वाढत्या महागाईत सायकल बरी, असे म्हटले तर काय वावगे ठरणार नाही.

हेमा जांभळे म्हणाल्या, सरकार इतर गोष्टीसाठी लाखो रुपये खर्च करत आहे, पण एसटी कर्मचार्‍यांना पगार वाढ करीत नाही. कर्मचारी वेतन आणि डिझेल वाढ ही कारणे सांगून प्रवाशांच्या बोकांडीवर भाडेवाढ टाकत आहे. हेच का अच्छे दिन आहेत. सुमारे 18 टक्के वाढ केली. ही वाढ योग्य नसून ती तूर्तास मागे घ्यावी आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा.
शोभा सावंत म्हणाल्या, कर्मचार्‍यांची  वेतनवाढ आणि डीझेल दरवाढीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केलेल्या दरवाढीमुळे जनतेचे आता आर्थिक बजेट कोलमडून पडणार आहे. पुणे 24 तर मुंबई 50 रुपयांनी तिकीट वाढले असल्याने दुचाकीवरून प्रवास केलेला परवडणार आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने तिकीट दर कमी करावा. तरच एसटीचा  प्रवास परवडणार आहे.

अनुसया जाधव म्हणाल्या, एसटी महामंडळाकडून देण्यात आलेले प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य बदलून टाकावे. कारण यात प्रवाशांची सेवा सोडून त्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. म्हणूनच अनेक लोक खासगी सेवा का स्वीकारतात याचे कारणही तसेच आहे. सध्या करण्यात आलेली 18 टक्के दरवाढ आणि त्यात महागाई यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. 

शुभांगी बागडे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महामंडळाकडून प्रवाशांसाठी प्रत्येक टप्प्यावर एक रुपया जादा आकारला जातो, हा नक्की कशासाठी हे अनेकांना माहीत नाही. हा एक रुपया विमा संरक्षण म्हणून तिकिटात आकारला जातो. मात्र, आतापर्यंत शेकडो जण अपघातात ठार झाले, जखमी झाले पण 99 टक्के लोकांना याची भरपाई अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे करण्यात आलेली दरवाढ कमी करून पूर्वीप्रमाणे तिकीट दर ठेवावेत. सुषमा चोरगे म्हणाल्या, राज्य महामंडळाकडून कर्मचारी पगारवाढ, डिझेल वाढ ही कारणे देऊन 18 टक्के तिकीट वाढ केली आहे.

पण, जसे डिझेल दर कमी होतात. त्यावेळी तिकिट दर कमी केले जात नाहीत असे का? आणि त्यात उन्हाळी सुट्टी, दिवाळी, दसरा किंवा इतर सणासुदीच्या कालावधीत दरवाढ केली जाते आणि प्रवाशांना आर्थिक भुर्दंड दिला जातो. त्यात आता तिकीट दर वाढविले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला लुटालुटीचे काम चालू आहे.