Tue, Mar 26, 2019 20:24होमपेज › Satara › एस.टी. कर्मचार्‍यांची सातार्‍यात निदर्शने 

एस.टी. कर्मचार्‍यांची सातार्‍यात निदर्शने 

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 9:07PMसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसंदर्भात एसटी कामगार संघटनेच्या  संयुक्त कृती समितीच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

एसटी कामगारांनी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग व इतर विविध मागण्यांसाठी दि. 17 ऑक्टोबरपासून 4 दिवस लाक्षणिक संप केला होता. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अंतरिम वाढ देण्याबाबतचा अहवाल सादर केला जाईल, असे नमुद करण्यात आले होते. मात्र दि. 15 जानेवारी रोजी न्यायालयात उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या अहवालात अत्यंत कमी वेतनवाढ करून त्यामध्ये वेतनाचे केवळ 10.5 टक्के वाढ दर्शवली असल्याने कामगारामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे  संयुक्त कृती समितीच्यावतीने सातारा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

याबाबत शासनाने कर्मचार्‍यांची योग्य दखल न घेतल्यास 9 फेब्रवारी रोजी राज्यातील सर्व एसटी कामगार कुटुंबासह मातोश्री मुंबई येथे आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे विभागीय सचीव शिवाजी देशमुख व कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर  घोणे यांनी सांगितले. संयुक्त कृती समितीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, कोण म्हणतंय देत नाय घेतल्याशिवाय रहात नाय, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा, सातवा वेतन आयोग मिळालाच पाहिजे, आदी घोषणांनी विभागीय कार्यालय परिसर कामगारांनी दणाणून सोडला होता.

निदर्शनात एस.टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स  (इंटक) काँग्रेस, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, संघर्ष ग्रुप, विदर्भ एसटी कामगार संघटना, कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.