Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Satara › एसटीत घुसून वाहकास मारहाण

एसटीत घुसून वाहकास मारहाण

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 10:41PMकराड : प्रतिनिधी 

कॉलेज युवकांच्या टोळक्याने एसटीत घुसून वाहकाला मारहाण केली. अभयचीवाडी तालुका कराड येथे रविवार दिनांक 5 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पाटण आगारची कराड-पाटण एसटी चालक पांडुरंग आनंदा पोळ व वाहक सोमनाथ सर्जेराव बोंगाणे हे कराडमध्ये प्रवासी घेऊन पाटणकडे निघाली होती. कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर प्रवासी घेण्यासाठी एसटी थांबली. यावेळी एसटीत घेण्याच्या व पाठीमागे जाण्याच्या कारणावरून एक प्रवासी व वाहक सोमनाथ बोंगाणे यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची व वादावादी झाली. कोल्हापूर नाक्यावर असणार्‍या एसटी कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. तरीही संबंधित प्रवासी एसटीत न बसता तेथेच वाहकास तुला दाखवतोच असे म्हणून अपशब्द बोलू लागला. यावेळी कोल्हापूर नाक्यावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करून चालक व वाहकास एसटी पाटणकडे घेऊन जाण्यास सांगितले. 

त्यानंतर चालक पांडुरंग पोळा व वाहक सोमनाथ बोंगाणे आपल्या ताब्यातील एसटी घेऊन पाटणला निघाले. जात असताना त्यांनी विजयनगर, सुपने या ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार केली. एसटी अभयचीवाडी येथील स्टॉपवर येताच चार जणांच्या टोळक्याने एसटीमध्ये चढून वाहक सोमनाथ बोंगाणे यांना मारहाण केली. यावेळी काही जण एसटीच्या दरवाजातून आत घुसले तर काहींनी चालकाच्या बाजूने एसटीत प्रवेश करून वाहकास मारहाण केली. 

यावेळी काही प्रवाशांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन मिनिटात कॉलेज युवकांच्या टोळक्याने चालकास मारहाण करून तेथून पोबारा केला. त्यानंतर चालक पांडुरंग पोळ यांनी प्रवाशांना घेऊन एसटी थेट कराड शहर पोलीस ठाण्यात आणली. कराड आगाराचे डुबल यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात वाहकास मारहाण केल्याप्रकरणी संबंधित युवकांवर गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होते.