Wed, Apr 24, 2019 20:05होमपेज › Satara › सर्वसामान्यांची एसटी आता नव्या रंगाढंगात 

सर्वसामान्यांची एसटी आता नव्या रंगाढंगात 

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 11:09PMसातारा : प्रतिनिधी

गरीबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एस.टी.चे रंगरूपही बदलत्या काळात बदलू लागले आहे. ग्रामीण व शहरी भागात लाल डब्बा म्हणून ओळख असलेल्या एसटीचा रंग अन् आकारही बदलू लागला असून परिवर्तन एसटी म्हणून आता या बसेस आकर्षक रंगसंगतीमध्ये पहावयास मिळणार आहेत. सातार्‍यात नव्या रंग अन ढंगातील ही एस.टी. बस प्रायोगिक तत्वावर दाखल झाली असून आगामी काही वर्षात ही आकर्षक बस खेड्यापाड्यातही धावताना दिसणार आहे. 

प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासाभिमुख, सुरक्षित व नवीन रंगसंगती, चांगल्या सोयी सुविधांचा समावेश असलेल्या नवीन बसची निर्मिती केली आहे. अ‍ॅल्युमिनीयमच्या बांधणीत तयार होणार्‍या बसेसऐवजी आता स्टेनलेस स्टीलच्या अधिक भक्कम बसेस सेवेत आणल्या आहेत. 

एस.टीचा तोटा वाढत असतानाच प्रवाशी संख्याही कमी होताना दिसत आहे. अशावेळी सुरक्षीत  प्रवासाबरोबरच त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी  स्पर्धेच्या युगात एसटीने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. सातारा विभागातही अशा एसटी बसेस दाखल झाल्या असून जिल्हा क्रीडा संकूलात झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात  या नवीन एसटी बसचे लॉचिंक करण्यात आले. त्यामुळे एसटीचा लाल डब्बा म्हणून  असलेली ओळख आता नवीन रंगात व ढंगात दिसणार आहे.

खिडक्या झाल्या भल्या मोठ्या;चालकाजवळ स्पीकरही

 नव्या बसेसचा रंगही आकर्षक असून त्यात बसच्या उंचीमध्ये 30 सेमीने वाढ करण्यात आली आहे. मजबुत आणि हलक्या वजनाच्या स्टीलमध्ये या बसची बांधणी करण्यात आली आहे.  आपत्कालीन स्थितीत प्रवाशांच्या सतर्कतेसाठी अलार्मची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. सामान ठेवण्यासाठी तिप्पट जागा, गाडीचे मार्गफलक  पाठीमागे व मुख्य दर्शनी भागात एलईडीमध्ये, बसच्या खिडक्यांचा आकारही वाढवण्यात आला आहे. 

 बसच्या सांध्यामध्ये थर्माकोलचा वापर केल्याने आवाज होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. बसमधील प्रवाशांना सूचना देण्यासाठी चालकांजवळ स्पीकरची सोय करण्यात आली आहे. हवा खेळती राहण्यासाठी छताला व्यवस्था करण्यात आली आहे.  हवेचा विरोध कमी होण्यासाठी ऐरोडायनामीक बनवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे ही बस वाल्व्हो बससारखी अलिशान थाटात दिसत आहे.