Sat, Mar 23, 2019 18:17होमपेज › Satara › ‘एस’ कॉर्नरची बळींची भूक भागेना 

‘एस’ कॉर्नरची बळींची भूक भागेना 

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 10:54PMखंडाळा : श्रीकृष्ण यादव/ शशिकांत जाधव / विठ्ठल हेंद्रे

सातार्‍याहून पुण्याकडे जाताना खांबाटकी बोगदा ओलांडून बेंगरुटवाडी गावानजीक महामार्गावर असणारे इंग्रजी ‘एस’ आकारासारखे वळण अनेक प्रवाशांचा कर्दनकाळ ठरले आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणात खांबाटकी बोगद्याची निर्मिती झाली. तेव्हापासून याच ‘एस’ कॉर्नरने शंभरहून अधिक बळी घेतले असून अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांना हिरावून नेले आहे. त्यामुळे हे संसार अक्षरश: देशोधडीला लागले. एवढेच काय अनेकांना कायमचे जायबंदी केलेे़  लाखमोलाचे जीव घ्यायला चटावलेल्या ‘एस’ कॉर्नरची बळींची भूक काही केल्या कमी होत नसल्याचे भीषण वास्तव मंगळवारच्या घटनेने समोर आणले आहे.

सर्वांत डेंजर स्पॉट

खंडाळा तालुक्यातून जाणारा  पुणे ते बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हा गेल्या अनेक वर्षांपासून नेहमीच चर्चेत राहिला आहे. यापूर्वी या महामार्गावरील प्रवास म्हणजे फार मोठे संकट मानले जायचे परंतु सुमारे वीस वर्षापुर्वी भाजपा - सेना युतीच्या काळात केंद्र शासनाच्यावतीने खंबाटकी घाटामध्ये चौपदरीकरणादरम्यान बोगदा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यावरील प्रवास सुखकर होईल, अशी आशा होती. परंतु रस्ता मोठा होवूनही अपघाताची मालिका काही संपली नाही. अपघाताची साखळी सुरू राहिली असून उलट त्यामध्ये वाढच झाली आहे.  त्याला कारणीभुत ठरले आहे ते ‘एस’ कॉर्नर. या मार्गाची आखणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे ‘एस’ कॉर्नरची निर्मिती झाली.  शिरवळ ते खंबाटकी घाट यादरम्यान अनेक अपघात स्पॉट निर्माण झाले. त्यामध्ये सारोळा पुल, ट्युब कंपनी, पंढरपूर फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव पुल, खंबाटकी बोगदा आदींचा समावेश असताना सर्वात डेंजर स्पॉट ‘एस’ कॉर्नर ठरला आहे.

सर्वांत मोठ्या अपघाताने तरी डोेळे उघडणार का? 

वारंवार होणारे अपघात, त्यात होणारी जीवीत व वित्तहानी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने रस्त्याचा तांत्रिक दोष दूर करुन उपाययोजना करण्यासंदर्भात अनेकदा रस्ते विकास महामंडळाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यावर जुजबी उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, अपघातांचे सत्र काही थांबत नाही. या ठिकाणी होणार्‍या अपघातांची भीषणता भयावह असते. याच ठिकाणी खंडाळ्याचे माजी सभापती अविनाश धायगुडे-पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला तर गतवर्षी गुजरात येथील बसचा अपघात, कंटेनर क्रुझर जीपवर पलटी झालेला अपघात, पुण्याच्या व्यापार्‍यांचा कार अपघात, अनेक कंटेनर, गॅस टँकर पलटी होऊन झालेले अपघात आठवले की अंगावर काटा उभा राहतो.

या अपघातामध्ये शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कर्नाटकातील कामगारांना घेऊन निघालेल्या आयशर ट्रकचा अपघात आजवरचा या ठिकाणचा सवार्र्ंत मोठा अपघात ठरला आहे. या ठिकाणी पोलीस व स्थानिक पारगाव खंडाळ्याचे ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक नेहमीच माणुसकीच्या भावनेतून मदतीसाठी तातडीने धावून  आल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे . अनेक निष्पापांचा बळी घेणारे हे वळण काढून या ठिकाणी रस्ता सरळ करावा, अशी मागणी होऊ लागली आहे .

सदोष रस्त्यामुळेच अपघात

सातारा - पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणात खांबाटकी टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी, बोगद्यापासून खंडाळा बाजूकडील तीव्र उतार लक्षात घेऊन टोलनाक्याजवळ वाहनांचा वेग कमी व्हावा, या उद्देशाने येथे रस्त्याला वळण दिले आहे. त्यामुळे जुन्या टोल नाक्यावर होणारे संभाव्य अपघात टळले असले तरी एस कॉर्नरवर भीषण अपघातांची मालिका सतत सुरू आहे.  येथील रस्त्याची सदोष रचनाच अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणी असणारा तीव्र उतार, वाहनांचा वाढता वेग, एस आकाराचे वळण यामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनांचा गुरुत्व मध्य ढासळून येथे अपघात होतात. धोकादायक वळण असल्याची पूर्वसूचना देणारे फलक बोगदा ओलांडल्यानंतर प्रशासनाने लावले आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी या फलकांकडे वाहनचालकांचे लक्ष जात नसल्याने अपघात घडत आहेत.

जखमींमुळे ‘सिव्हिल’ही गलबलले

सातारा : विठ्ठल हेंद्रे

‘एस’ कॉर्नरला आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाल्यानंतर जखमींना बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी खंडाळा, शिरवळ व नंतर सातार्‍यातील सिव्हिलमध्ये हलवण्यात आले. लहान मुले, महिला व पुरुष असे एकूण 16 जखमी सिव्हीलमध्ये आल्यानंतर त्यातील एकमेव महिला बोलण्याच्या स्थितीत होती. मात्र, तिच्यासह सर्वांचेच चेहरे अपघाताच्या आवाजाने भेदरलेले स्पष्टपणे जाणवत होते. जखमींची  ही भीषण अवस्था पाहून सिव्हील रुग्णालयही गलबलून गेले. 

जखमी कमालीचे भेदरलेले

खंबाटकी बोगद्यात अपघात झाल्यानंतर पोलिस व स्थानिक नागरिकांनी बचावकार्याची मोहीम राबवली. प्राथमिक उपचारासाठी जखमींना परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर जखमींना तत्काळ पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय तथा सिव्हीमध्ये हलवण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता सिव्हील हॉस्पिटलमध्ये अचानक पाच ते सात रुग्णवाहिका अलर्ट हॉर्न वाजवत आल्यानंतर सिव्हीलही खडबडून जागे झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून बाहेर काढून तत्काळ गंभीर जखमींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. दोन लहान मुलांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रक्‍त लावावे लागलेे. सर्वच जखमींचे चेहरे कमालीचे भेदरल्याने कोणीच बोलत नव्हते. हे जखमी कर्नाटक राज्यातील असल्याने व मराठी समजत नसल्याने  अडचणी निर्माण होत होत्या. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर एकमेव महिला बोलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, अपघातामुळे ती कमालीची घाबरलेली होती.

116 अपघात;  73 ठार, 216 जखमी

पुणे-बेंगळूरू महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत खंबाटकी घाट हे अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. पूर्वी या घाटातून दोन्ही बाजूची वाहतूक केली जात होती. मात्र, येथे वारंवार होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी व वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी प्रशासनाने सातार्‍याहून पुणे, मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी बोगदा बनवला. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटली. मात्र, प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. खंबाटकी बोगद्यातून बाहेर आल्यानंतर पुढे तीन ते चार किलोमीटरचा घाट रस्ता आहे; तसेच बोगद्यातून बाहेर पडल्यावर लगेच तीव्र उताराचे ‘एस’ आकारातील नागमोडी वळण आहे. उतार आणि वळण असल्याने वाहनचालकाला गाडी नियंत्रणात ठेवता येत नाही.

खंबाटकी घाटात दरवर्षी सरासरी 30 मोठे अपघात होतात. खंबाटकीतील धोकादायक वळणावर 2008 पासून 2017 अखेर 116 अपघातात सुमारे 73 जणांना प्राण गमावावे लागले असून 216 जण जखमी झाल्याची नोंद आहे.
यावर्षाच्या सुरुवातीला पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महिनाभरात खंबाटकी घाटात 1 हजार कोटी रुपये खर्चून 6 लेनचा बोगदा बांधण्याच्या कामाची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती.सातारा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) आजवर 50 हून अधिक पत्रे लिहून खंबाटकीतील ‘एस’ वळण हटवून हा रस्ता सरळ करण्याची विनंती केली. सातारा जिल्हा प्रशासनानेही अनेकदा याबाबत संबंधित विभागांची बैठक बोलावून या प्रश्नाकडे लक्ष वेधले. खंबाटकी बोगद्याच्या परिसरातील धोकादायक वळण सरळ करण्याचा निर्णय ‘एनएचएआय’ने 2015 मध्ये घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव ‘एनएचएआय’च्या पुणे विभागाने नोव्हेंबर 2015 मध्ये दिल्लीच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता. 

पुणे - बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटानजीकचा ‘एस’ कॉर्नर हा यमदूूत बनून प्रवांशांच्या जीवावर उठत असताना शासकीय यंत्रणा मात्र माणुसकी हरवून गेल्याप्रमाणे वागत आहे. मंगळवारच्या भीषण दुर्घटनेला जबाबदार असणार्‍या अधिकारी व यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी खंडाळा तालुक्यातून होत आहे. 

सातार्‍यातही नातेवाईक 

जखमींवर उपचार सुरु असताना सातार्‍यातील लक्ष्मी टेकडी येथील काही नागरिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी कन्‍नडमधून संवाद साधल्यानंतर अपघातग्रस्त हे सातार्‍यातील नातेवाईक असल्याचे समोर आले. कामानिमित्त हे सर्वजण विजापूरमधून बाहेर पडले होते. टोळ्यांच्या माध्यमातून जिथे कामे मिळतील तेथे हे तीन ते चार महिने थांबतात व पुन्हा गावाकडे जातात. प्राथमिक माहितीनुसार यातील बहुतेकजण शिरवळ येथे कामाला निघाले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अवघ्या काही अंतरावर असतानाच त्यांच्यावर दुर्देवी काळाचा घाला पडला आहे.

उपचारासाठी सिव्हिल अलर्ट

भीषण अपघातातील जखमी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्याचे समजाताच सातार्‍यातील अनेक सामाजिक संघटनांनी, राजकीय, प्रशासकीय पदाधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेवून जखमींची पाहणी केली. जखमींना उपचारामध्ये हयगय होणार नाही यासाठी सिव्हिल रुग्णालय अलर्ट राहिल, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीकांत भोई यांनी दिली.

कोणाच्या खोपडीतून आली ही वळणे?

‘एस’ कॉर्नरच्या तीव्र उतारावर वाकडी तिकडी वळणे कोणत्या अभियंत्याच्या खोपडीतून तयार करण्यात आली? असाच प्रश्न प्रत्येक अपघातानंतर केला जात आहे. अपघाताचा स्पॉट असलेला हा ‘एस’ कॉर्नर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी वारंवार मागणी केली. त्यासाठी मोर्चा, उपोषण आदी आंदोलने करण्यात आली परंतु संबधित एन.एच.आय व ठेकेदार यांना त्याचे काहीही देणं-घेणं नसल्याने जुजबी उपाययोजना वगळता ठोस पर्याय करण्यात आले नाहीत.

खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर ‘एस’ कॉर्नर किती डेंजर आहे याची कल्पना या ठिकाणाहून प्रवास केलेल्या प्रत्येकाला समजून येते. या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजना या जुजबी ठरत असल्याचे अपघातांच्या आकडेवारीवरुन  दिसून येत आहे. असे असताना हा संपूर्ण ‘एस’ कॉर्नर काढण्यासाठी शासकीय यंत्रणा का निर्णय घेत नाही हाच खरा प्रश्न आहे. आता 18 जणांचा बळी गेल्यानंतर तरी संबंधित शासकीय यंत्रणा जागी होणार आहे की नाही? का या अपघाताची चर्चा दोन दिवस होवून पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे परिस्थिती होणार? हे पहावे लागणार आहे.