Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Satara › मलकापुरात सत्ताधारी, विरोधक आमने सामने

मलकापुरात सत्ताधारी, विरोधक आमने सामने

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 10:57PMकराड : प्रतिनिधी 

मलकापूर (ता. कराड) नगरपंचायतीला ‘क’ वर्ग नगरपालिकेचा दर्जा मिळण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी काँग्रेससह विरोधी गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नगरपालिका व्हावी, म्हणून उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कराडमधील कोल्हापूर नाक्यावर गुरूवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. तर दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी पडलेले इतर मागासवर्ग हे आरक्षण कायम ठेवावे, यासाठी इतर मागासवर्ग समाजाकडून नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. 

मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळावा, यासाठी सत्ताधारी काँग्रेस आग्रही आहे. मात्र असे असले तरी वीस दिवसांपूर्वी मलकापूर नगरपंचायतीची प्रभाग रचना जाहीर होऊन प्रभागांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. तत्पूर्वीच नगराध्यक्ष पदासाठी ‘इतर मागासवर्ग’ हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक येत्या एक ते दोन महिन्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर मलकापूरला नगरपालिका दर्जा मिळाल्याने पुन्हा निवडणूक होऊन त्याचा बोजा अप्रत्यक्षरित्या नागरिकांवरच पडणार आहे. नगरपालिका झाल्यास नगरसेवकांची सदस्य संख्या 17 वरून 19 होणार आहे. यात एका महिला नगरसेविकेसह इतर मागासवर्ग समाजातील नगरसेवकाला संधी मिळणार आहे.

विकास कामांनाही मिळणार्‍या निधीत वाढ होणार आहे. त्यामुळेच नगराध्यक्ष पदासाठी पडलेले इतर मागासवर्ग हे आरक्षण बदलण्यासाठीच नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळावा, ही मागणी आपण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र या आरोपात तथ्य नसल्याचेही उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थक उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी उपसभापती आनंदराव सुतार, शंकरराव चांदे, नगराध्यक्षा सुनिता पोळ तसेच शेकडो नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले.

दरम्यान, मनोहर शिंदे यांच्यासह आ. पृथ्वीराज चव्हाण हे इतर मागासवर्ग समाजाला कोणत्याही गटातून, पक्षातून नगराध्यक्षपद पाच वर्षासाठी भूषवण्याची मिळालेली संधी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी, म्हणून हालचाल सुरू करण्यात आल्याचा दावा इतर मागासवर्ग समाजातील काहींनी करत मलकापूर नगरपंचायतीसमोर उपोषण केले. प्रतापराव उर्फ महेश भोसले, अण्णासोा काशिद, दिनेश नार्वेकर, अशोक दिवटे, चंद्रकांत लाखे यांचयासह त्यांचे सहकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

शिवसेना पदाधिकार्‍यांनी नोंदवला निषेध..

नामोल्लेख टाळत स्थानिक राजकीय लोकच नगरपालिका होण्यास विरोध करत आहेत. काहीजण या प्रश्‍नी आमच्यासोबत असल्याचे नाटक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप करत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पडलेले इतर मागासवर्ग हे आरक्षण कायम ठेवत नगरपालिका दर्जा देण्याची मागणी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केली आहे. 

Tags : Satara, Ruling, party,  Malkapur, opponent, face