Sat, Jun 06, 2020 19:09होमपेज › Satara › सातार्‍यात ‘ट्विंकल’कडून साडेतेरा लाखांची फसवणूक

सातार्‍यात ‘ट्विंकल’कडून साडेतेरा लाखांची फसवणूक

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:27PMसातारा : प्रतिनिधी

नटराज मंदिराशेजारी असणार्‍या रॉयल ट्विंकल स्टार क्‍लब प्रा.लि. या गुंतवणूकदार कंपनीने सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत याप्रकरणी 13 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक झाली असून 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी 20 तक्रारदार समोर आले असून आणखी तक्रारदार वाढण्याची शक्यता आहे.

रॉयल ट्विंकल स्टार क्‍लब प्रा.लि. या कंपनीचे मालक ओमप्रकाश बसंतलाल गोयंका, संचालक प्रकाश गणपत उत्तेकर, वेंकट रमन नटराजन, एन. एस. कोटणीस, कंपनीचे मार्केटिंग अधिकारी व इतर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहेे. याप्रकरणी सौ.रंजना दिलीप पाटील (वय 46, रा. वेचले, ता. सातारा) यांनी तक्रार दिली असून त्यांच्यासह सद्यःस्थितीला 20 तक्रारदार समोर आले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार रंजना पाटील यांनी 18 डिसेंबर 2008 ते 18 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी ट्विंकलमध्ये गोल्ड प्लॅनसाठी 1 लाख रुपये गुंतवले होते. दहा वर्षांनंतर या कंपनीने 3 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. पैसे मिळण्याची मुदत झाल्यानंतर त्या पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर मात्र कंपनीने पैसे दिले नाहीत. वेळोवेळी जाऊन पैशांची मागणी करूनही पैसे मिळत नसतानाच सध्या सातारा येथील कार्यालय बंद झाले आहे.

अशा प्रकारे संशयितांनी आपआपसात संगनमत करून आकर्षक परव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आले. पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर ट्विंकलकडून अनेकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार आतापर्यंत एकूण 13 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, सातार्‍यात पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये आणखी तक्रारदार वाढण्याची शक्यता असून आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा पुढील तपास वर्ग करण्यात आला आहे.