Sat, Jul 20, 2019 10:43होमपेज › Satara › रोनाल्डची बालसुधार केंद्रातील मुलांना मदत

रोनाल्डची बालसुधार केंद्रातील मुलांना मदत

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 8:56PMकराड ःप्रतिनिधी

कराड  येथे वैद्यकीय शिक्षणासाठी आलेल्या मुंबई येथील रोनाल्ड रेनिस्टर कब्राल या विद्यार्थ्याने आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठीच्या खर्चात बचत करून येथील बालसुधार केंद्रातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. रोनाल्डने मुदत म्हणून दिलेल्या दप्तरामुळे मुलांच्या चेहर्‍यावर आंनद दिसत होता. त्याचा हा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे. 
कराडच्या बालसुधार केंद्रातील कित्येक बालकांच्या नशिबी अत्यंत हालाखीची परिस्थिती आलेली असते. बालसुधारगृहातच आपल्या भवितव्याचा शोध ते घेत आहेत. असे असले तरी या मुलांना समाजातून अनेक दानशूर व्यक्‍ती आपआपल्यापरिने मदत करत आहेत. 

कराड हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. कराड, मलकापूर परिसरात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात आणि आपआपल्या गावी निघून जातात. या विद्यार्थ्यांना तीन ते चार वर्षाच्या काळात इथल्या परिस्थितीच्या संवेदना समजण्यासाठी बहुधा वेळच मिळत नाही. याला अपवाद ठरला आहे तो कृष्णा इन्स्टिटयुट ऑफ मेडीकल सायन्सेस तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणारा रोनाल्ड. शिक्षणासाठी कोयना वसाहतीत भाड्याने फ्लॅट घेऊन तो मित्रांसमवेत राहतो. वडिल रेनिस्टर कब्राल यांनी रोनाल्डला शिक्षणासाठी प्रवेश घेतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण दिली.

त्यामुळे गत महिन्यात रिक्षातून प्रवास करताना त्याने रिक्षाचालकास आपणास उपेक्षितांना मदत करायची आहे असे सांगितले. त्या रिक्षाचालकाने मलकापूरचे माजी नगरसेवक सुभाष माने यांची रोनाल्डची ओळख करून दिली.  माने यांनी रोनाल्डला बालसुधार केंद्रात नेले. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रोनाल्डचे डोळेही पाणावले. त्यांने विद्यार्थ्यांना काय गिफ्ट हवे असे विचारल्यावर त्यांनी दप्तर हवे असे सांगितले. दुसर्‍याच दिवशी रोनाल्ड चांगल्या प्रतिची दप्तरे घेऊन बालसुधार केंद्रात दाखल झाला. नवीन दप्तरे पाहून मुलांच्या चेहर्‍यावर आनंद झळकला.