Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Satara › टाळगावच्या भगिनींची ज्युदोत ‘दंगल’

टाळगावच्या भगिनींची ज्युदोत ‘दंगल’

Published On: Apr 14 2018 10:33AM | Last Updated: Apr 13 2018 8:55PMउंडाळे : वैभव पाटील

गीता फोगट आणि बबिता फोगट या भगिनी यश मिळाल्यानंतर जगासमोर आल्या. कदाचित त्या संघर्ष करताना त्यांना मदत मिळाली असती तर त्याचा त्रास आणि संघर्ष कमी झाला असता. अशाच कराड दक्षिण विभागातील टाळगाव, ता. कराड येथील दोन बहीणी संघर्ष करीत आहेत. गवंडी काम करणार्‍या मजुराच्या दोन जुळ्या मुली ज्युदोत राष्ट्रीयस्तरावर चमकल्या आहेत. त्यातील एकीची निवड आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. या महाराष्ट्रीय कराडकर फोगट भगिणींच्या दंगलीकडे संपूर्ण विभागाचे लक्ष लागून  राहिले आहे.

कराड तालुक्यातील टाळगाव हे दुर्गम गाव. गावातील संभाजी मोहिते गवंडी काम करतात. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. टाळगाव या गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना त्यांचे विविध क्षेत्रातील क्रीडा कौशल्य शिक्षकांनी हेरले. त्यांना खेळात पुढे करायचं शिक्षकांनी ठरवलं मात्र, घरची गरीबी आणि खेळासाठी नसलेल्या सुविधांमुळे घरच्या विरोध केला. शिक्षकांनी मनधरणी केल्यानंतर कसेतरी पालक तयार झाले आणि रोहिणी  मोहिते आणि रागिणी  मोहिते यांचे खेळातले करिअर सुरु झालं दोघींचीही क्रीडाप्रबोधिनीला निवड झाली. तिथे ज्युदो खेळात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. आता रोहीणीची निवड आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे तर रागिणी राष्ट्रीय स्तरावर खेळत आहे.

या दोघींनाही अमरावती येथील डॉ. सतीश पहाडिया यांचे मार्गदर्शन लाभले. आजपर्यंत या दोघी बहिणींनी विविध ठिकाणी झालेल्या  क्रिडा स्पर्धेत 100 पेक्षा अधिक बक्षिसे पटकावली आहेत. या बक्षिसांमुळे या मुलींचे नाव राज्य पातळीवर चमकले. इतकेच काय त्यांना राष्ट्रीय पातळीवर ही मोठे यश आले आता तर आशियायी स्पर्धेसाठी  एकीची निवड झाल्याने  या दोन बहिणींच्या कामगिरीची चर्चा राज्याबरोबर सातारा जिल्ह्यात मोठ्या अभिमानाने सुरू आहे. याबरोबरच शालेय शिक्षणातही या दोघी टॉपवर आहेत. परिस्थितीवर मात करत या दोन बहिणींनी जरी यश मिळवले असले तरी या यशाचे कौतुक मात्र कोणालाही नाही. उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी या कुटूंबाला आर्थिक भार पेलवणेसाठीची क्षमता नाही. यासाठी सेवाभावी संस्था किंवा दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज आहे.

रोहीणी आणि रागिणी या टाळगावच्या सुकन्या आहेत. त्यांच्या अडीअडचणींना गाव उभे राहते, प्रोत्साहनही देते. आता या दोघींनीही आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावावे, यासाठी साथ द्या. अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.     - राजश्री मोहिते, आई

गवंडी काम करुन चरितार्थ चालवणार्‍या कुटुंबासाठी हे सगळं नवीन आहे. आर्थिक अडचणी असल्या तरी क्रीडा प्रबोधनीमुळे भार हलका झालांय. मात्र तरीही आणखी उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची गरज आहे. ते मोहिते परिवाराला शक्य नाही.   - संभाजी मोहिते, वडील

एका छोट्याशा गावात कोणत्याही सुविधा नसताना दोघींनीही  खेळामध्ये खूप मोठी मजल मारली आहे. सुरुवातीला विरोध करणारा पिताच आता मुलींच्या यशामुळे भारावला आहे.  - रोहिणी मोहिते

एखाद्या क्षेत्रात संघर्ष करुन यश मिळवल्यानंतर सगळे कौतुक,  मानसन्मान वाट्याला येते. मात्र, जर संघर्ष करतानाच आधार मिळाला तर खूप मोठं होता येतं. यासाठी मोहिते भगिनींना आताच मदत मिळण्याची गरज आहे.    - ब. ल. पाटील, ग्रामस्थ व व्हा चेअरमन, स्वा सैनिक शामराव पाटील पतसंस्था.

 

 

Tags : karad, karad news, Rohini Mohite, Asian Game,