होमपेज › Satara › सातारा : रोहनवर अंत्यसंस्कार; आमदार, खासदारांचे श्राद्ध घालणार(Video)

सातारा : रोहनवर अंत्यसंस्कार; आमदार, खासदारांचे श्राद्ध घालणार(Video)

Published On: Jul 27 2018 4:57PM | Last Updated: Jul 27 2018 6:13PMकराड : प्रतिनिधी 

चाफळ परिसरातील खोनोली (ता. पाटण) येथील रोहन तोडकर या नवी मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान हत्या झालेल्या युवकावर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संतप्त मराठा युवकांनी "एक मराठा, लाख मराठा"चा घोष करत शनिवारी पाटण तालुका बंदची हाक दिली. तसेच राज्यातील मराठा आमदार, खासदारांचे श्राद्ध घालण्याचा इशाराही देण्यात आला.

चाफळ येथे चार तासाहून अधिक काळ रोहन तोडकर याचा मृतदेह घेऊन आलेल्या रूग्णवाहिकेसह पोलिसांच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी, आमदार शंभूराज देसाई यांच्यासह स्वत: मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्‍वासन दिले. त्यानंतर चाफळमधून रोहन तोडकर याचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका खानोली गावाकडे सोडण्यास मराठा युवकांनी परवानगी दिली होती. खोनोली येथे रोहनचा मृतदेह प्रथम घरी आणि तेथून अर्धा तासाने स्मशानभूमीकडे नेण्यात आला. तेथे मराठा युवकांनी आरक्षणासाठी रोहनला जीव गमावावा लागल्याबद्दल राग व्यक्त केला. तसेच पाटण बंदची हाक देत मराठा आमदार, खासदार यांचे श्राद्ध घालण्याचा इशारा दिला. दरम्यान, तणावाची परिस्थिती पाहता पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्यासह चाफळ परिसरात शेकडो पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.