Fri, Apr 26, 2019 19:35होमपेज › Satara › सातार्‍यात घरफोड्यांचे सत्र

सातार्‍यात घरफोड्यांचे सत्र

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 11:10PMसातारा : प्रतिनिधी
सातार्‍यात चोरट्यांनी अक्षरश:  धुडगूस घालत मंगळवारी पहाटे सदरबझार येथील गुलमोहर कॉलनीत दोन घरफोड्या, तर बुधवार पेठेत घरात घुसून सोने, चांदी व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही घटनांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांवर तत्काळ कारवाई करावी व सुरक्षितता द्यावी, अशी मागणी महिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन केली. दरम्यान, चोरट्यांनी चोरीवेळी टीव्ही, कॅमेरा, मोबाईल अशा वस्तूही चोरी केल्या आहेत.

सदरबझार येथे गुलमोहर कॉलनी असून, मंगळवारी पहाटे प्रा. संध्या चौगुले यांच्या घरासह परिसरातील काही घरे चोरट्यांनी टार्गेट केली. चोरट्यांनी मध्यरात्री खिडकीतून हात घालून खोली उघडली. घरामध्ये प्रवेेश केल्यानंतर चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त करून 60 हजार रुपये किमतीचा डीएसएलआर कॅमेरा चोरून नेला. याव्यतिरिक्‍त चोरट्यांच्या हाती काही लागले नसून, चोरी करत असताना एक चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, चोरट्यांनी दुसर्‍या घराकडे मोर्चा वळवत तेथून टीव्ही, पर्स, मोबाईल चोरी केली. मंगळवारी सकाळी चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. परिसरात ठिकठिकाणी चोर्‍या झाल्याचे समोर आल्यानंतर महिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना भेटून घटनेबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी रात्री 2 घरे तर गेल्या आठ दिवसांत सुमारे 8 घरांमध्ये चोर्‍या झाल्याचे समोर आले आहे. मात्र चोरीमध्ये विशेष काही न गेल्याने इतर तक्रारदारांनी सुरुवातीच्या चोरीची माहिती पोलिसांना दिली नाही. मंगळवारी पुन्हा चोर्‍या झाल्यानंतर मात्र महिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

जोहरा शकील शेख (रा.बुधवार पेठ, सातारा) यांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी तक्रारदार या दुपारी दीड ते साडेतीन यावेळी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरी त्यांची वृध्द सासू होत्या. याचाच गैरफायदा घेत अनोळखी दोघेजण गेले व शकील यांचे मित्र असल्याचे सांगून घरात गेले. यावेळी शकील यांच्या वृध्द आई चहा, पाणी करण्यासाठी किचनमध्ये गेल्यानंतर संशयितांनी घरातील तिजोरीचे लॉक काढले. अवघ्या पंधरा मिनिटात चोरट्यांनी घरातील सोने, चांदी व रोकड असा 1 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

तक्रारदार जोहरा शेख घरी आल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. दोघेजण घरात येवून गेल्याचे समजल्यानंतर चोरी त्यांनीच चोरी केल्याचे समोर आले. तत्काळ शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. दरम्यान, सातार्‍यातील या सलग चोर्‍यांमुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा व मध्यरात्री चोरटे थेट घरात घुसत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होवू लागली आहे.