होमपेज › Satara › दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी गजाआड

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी गजाआड

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:23PMसातारा : प्रतिनिधी

महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत साखरेची पोती भरलेल्या ट्रकची ताडपत्री कापून चोरी करण्याच्या प्रयत्नात असणारी टोळी मेढा पोलिसांनी गजाआड केली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कटावणी, दोन हेक्सॉ ब्लेडचे तुकडे, लोखंडी रॉड, पाईप व चटणीची पुडी असे चोरीचे साहित्य जप्‍त करण्यात आले. 

साखरेने भरलेल्या ट्रकमधील साखरेची चोरी करण्याचा प्रयत्न केलेले चोरटे मेढ्याच्या दिशेने येत असल्याची माहिती पोनि जीवन माने यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार वाघ, पोना लंकेश पराडके, विकास कदम, संजू काळे व नितेश कणाके यांना केळघर घाटात वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले. वाहनांची तपासणी करत असताना टाटा एस क्रमांक एम. एच. 11 एजी. 7169 ला थांबण्याचा इशारा केल्यानंतर ती भरधाव वेगाने निघून गेली. या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर ती काळाखडा येथे थांबवली. या वाहनाच्या हौद्यातील एक जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

या गाडीमध्ये सचिन तानाजी मोरे (वय 31) रा. काळोशी, ता. सातारा, संजय उर्फ दत्तात्रय किसन राठोड (वय 28) रा. सैदापूर, ता. सातारा, विक्रम उर्फ विक्रमसिंह रामदास चव्हाण (वय 33) रा. पिरंगुट जि. पुणे आणि गुडाराम उर्फ गुंडा उर्फ तारासिंग चंद्रसिंग चव्हाण (वय 38) रा. काळाखडक झोपडपट्टी, पुणे हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्‍त करण्यात आले. साखरेच्या ट्रकवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाल्याचे निष्पन्‍न झाले आहे. या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.