Sat, Apr 20, 2019 08:14होमपेज › Satara › ‘गेला गेला आमचा सातारा खड्ड्यात गेला..’

‘गेला गेला आमचा सातारा खड्ड्यात गेला..’

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 11:27PMसातारा :  संजीव कदम 

सुमारे महिनाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सातारा शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अगोदरच निकृष्ट काम, त्यात मुसळधार पाऊस यामुळे सातार्‍यातील रस्ते अक्षरश: कुरतडून टाकले आहेत. कुठेही जावा खड्ड्यांशिवाय प्रवासच होत नाही. हे खड्डे आता सातारकरांच्या एवढे अंगवळणी पडले आहेत की खड्डा नसेल तर प्रवासालाही चुकल्या-चुकल्यासारखे वाटत  आहे.  पावसाने निकृष्ट कामाचा पंचनामा तर केलाच आहे; पण वाहनचालकांना चांगलेच नाकीनऊ आणले आहे. ‘गेला गेला गेला आमचा सातारा खड्ड्यात गेला...’  अशी अवस्था झाली असून अवघा सातारा खड्ड्यात बुडून गेल्याचे चित्र शहरातील सर्वच रस्त्यावर ठळकपणे दिसून येत आहे. 

जुना आरटीओ चौक डेंजरझोन

शहरातील अनेक रस्ते धोकादायक बनले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ चौक या रस्त्याचे काम रखडवत ठेवले आहे. सध्या या ठिकाणी रस्ता उरलाच नसून  खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संंबंधित मार्ग डेंजर झोन झाल्याने वेळीच उपाययोजना न केल्यास याठिकाणी अपघात होऊ शकतो. 

 योजना पूर्ण होतील त्यावेळी या रस्त्यांची कामे केली जाणार असली तरी तात्पुरती उपाययोजना म्हणून नगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांना दिला आहे. 

वाहनचालकांना करावे लागतेय अग्‍निदिव्य...

पोवईनाक्यावर ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे वाहनचालकांना अग्‍निदिव्य करावे लागत आहे. रयत शिक्षण संस्था परिसर तसेच मरियाई कॉम्प्‍लेक्सच्या पिछाडीकडून येणारे पावसाचे पाणी याच रस्त्यावर येते. त्यामुळे महाराजा हॉटेलसमोर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याच्या पुढे संपूर्ण रस्ता खडबडीत आहे. या चौकातील रस्ता दुरुस्त करण्याची वाहनचालकांची मागणी आहे. त्याचबरोबरच हेम एजन्सीजसमोर वाहतुकीस एकेरी केलेल्या रस्त्यावर खड्डे आहेत. त्याची दुरुस्ती केलेली नाही. ‘एकेरी’  वाहतुकीत खड्ड्यांची ‘बेफिकीरी’ दाखवली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

बुधवार नाक्यावर रस्त्याची चाळण 
 खड्ड्यांच्या ग्रहणाने रस्त्यांना जणू गिळले आहे. राधिका रस्त्याचे काम दोनच वर्षांपूर्वी झाले. या रस्त्याला खड्डे पडणार नाहीत, असा दावा त्यावेळी संबंधित ठेकेदाराने तसेच पालिका पदाधिकार्‍यांनी केला होता. मात्र, रस्ता होताच बुधवार नाक्यावर खड्डे पडू लागले. शिंदे बंगल्यासमोर पुलाजवळ वळणावरच पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. 

एका बाजूला चर तर दुसरीकडे कचरा
रस्त्याची एक बाजू खड्ड्यात गेल्यामुळे बाजार समिती कॉर्नर परिसरात  अपघात होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी संग्रहालयाजवळ जोडणार्‍या या रस्त्याच्या एका बाजूला चर पडला आहे.  दुसर्‍या बाजूला सडक्या भाज्या व कचर्‍याचा खच असल्याने वाहतुकीची दैन्यावस्था झाली आहे. वाहतुकीची रीघ असतानाही उपाययोजना  नसल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.