Tue, Apr 23, 2019 19:47होमपेज › Satara › मी लाभार्थी रिक्षा परवान्याचा 

मी लाभार्थी रिक्षा परवान्याचा 

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 10:23PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

1997  पासून शासनाने बंद केलेले रिक्षा परवाने आता सर्वांसाठी खुले झाले असून आत्तापर्यंत रिक्षाचालक म्हणून काम करणारे आता थेट परवाने धारक झाल्याने मालक म्हणून  रुबाबात मिरवणार आहेत. कराड उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत पंधरा दिवसांत तीनशे लाभार्थींना परवान्याचे वाटप करण्यात आले आहे. 

1997 पासून शासनाने रिक्षा परवाने देणे बंद केले होते. त्यामुळे दुसर्‍याचा परवान्यावर रिक्षा चालवून शेकडो रिक्षाचालक स्वत:चा व कुटुंबाचा  उदरनिर्वाह चालवत होते. मात्र आता मागेल त्याला परवाना देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तब्बल 19 वर्षानंतर   परवाने देणे सुरू झाल्याने परवान्याच्या प्रतीक्षेेत असणार्‍या रिक्षाचालकांचा जीव भांड्यात पडला आहे.21 नोव्हेंबर पासून कराड परिवहन विभागामार्फत परमिट वाटप सुरू करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत साधारण तीनशे जणांना परवान्याचे वितरण करण्यात आले आहे. अ‍ॅटो रिक्षा चालकांना नियम व अटीच्या अधीन राहून हा परवाना देण्यात येत आहे. दररोज सकाळी 11 ते 12 या या वेळेत सर्व अर्ज स्वीकारने, दुपारी कागदपत्रांची तपासणी करून संबंधित लाभार्थींची सही व अंगठा घेऊन सदरील अर्जाची संगणकावर नोंद केली जात आहे. यानंतर संबंधित व्यक्तीला त्या दिवशी अथवा दुसर्‍या दिवशी मोबाईलव्दारे मेसेज पाठवून परवाना घेऊन जाण्याबाबत कळविले जात आहे. दुपारी चार नंतर परवान्याचे वितरण करण्यात येत आहे. 

परवान्याची इतकी सुलभ व्यवस्था कराड उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असल्याने रिक्षाचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन कर वसुली अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी निळकंठ पाटील व उमाकांत दीक्षित काम पहात आहेत.