Wed, Apr 24, 2019 21:59होमपेज › Satara › महसूल अधिकारी असल्याचे सांगत मागितली खंडणी

महसूल अधिकारी असल्याचे सांगत मागितली खंडणी

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 10:49PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

महसूल अधिकारी असल्याचे सांगत वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाकडे 50 हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी मानव अधिकारी कल्याणकारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार, दि. 27 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  फिरोज खान (पूर्ण नाव माहीत नाही) असे खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विजय वसंतराव निकम (वय 34, रा. रुक्मिणीनगर, वाखाण रोड, कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, विजय निकम यांनी विनायक सर्जेराव पाटील यांच्याकडून सन 2016 मध्ये दोन ब्रास वाळू खरेदी केली होती. खरेदी केलेली वाळू हजारमाची गावच्या हद्दीत मुकबधिर शाळेसमोरील स्वमालकीच्या जागेत ठेवली होती. 27 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यातील एक ब्रास वाळू ट्रक्टरमधून कराडला आणली जात होती. नागाप्पा कळकी हा वाळूचा ट्रक्टर चालवित होता.

ट्रक्टर कृष्णा पुलावरून कराड बाजुकडे येत असताना डोंबार गल्लीमध्ये एका हिरव्या कार चालकाने ट्रक्टरला गाडी आडवी मारून ट्रक्टर आडविला. त्यानंतर कारमधून एकजण खाली उतरत त्याने ट्रॅक्टरचे व वाळुचे शुटींग करण्यास सुरवात केली. यावेळी ट्रक्टरचालक नागाप्पा कळकी याने विचारणा केली असता त्याने महसुल खात्याचा अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही बेकायदा वाळूची वाहतूक करत आहात असे म्हणत त्याने ट्रक्टरचालकाकडे 50 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास फौजदारी कारवाई करण्याची धमकी देऊन संशयित तेथून निघुन गेला. 

त्यानंतर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी संबंधित ट्रक्टर वाळूसह कचेरीत नेला. 28 डिसेंबर रोजी तहसिदारांनी वाळू वाहतुकीसंदर्भात फिर्यादीस नोटीस दिली. त्यावेळी खान नावाचा इसम पुन्हा कचेरीत आला. त्याने तुम्ही मला 50 हजार द्या नाहीतर साहेबांना सांगून तुमचा ट्रक्टर सोडून देणार नाही, येथेच सडवीन अशी धमकी दिली. धमकी देत असतानाच संशयिताने त्याच्याजवळचे मानव अधिकार कल्याणकारी संघटना असे लिहलेले कार्ड दिले. संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला कसा त्रास देतो ते बघाच अशी धमकीही पुन्हा त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.