Thu, Jun 20, 2019 21:10होमपेज › Satara › आंदोलनाबाबत महसूलमंत्र्यांनी शिकवू नये 

आंदोलनाबाबत महसूलमंत्र्यांनी शिकवू नये 

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:30PMदहिवडी : प्रतिनिधी 

रविवारी रात्री 12 वा. पंढरपूरला विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दुग्ध अभिषेक करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे. दुधाचे भाव कमी असल्याने कर्नाटक व केरळ राज्या प्रमाणे दुधाला पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी  राज्यभर दूध बंद आंदोलन सुरू करण्यात येत आहे. आंदोलन कसे करावे हे महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी शेतकरी संघटनेस शिकवू नये, असा टोला स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राज्य अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मारला.

दहीवडी येथे आयोजित दूध उत्पादक संघ व शेतकरी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी पक्ष व संघटनेच्या वतीने रविवारी मध्यरात्री पासून मुंबई व अन्य शहरांना दूध पुरवठा बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. प्रकाश पोपळे, जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांच्यासह माण तालुक्यातील कार्यकर्ते व दूध उत्पादक उपस्थित होते. तुपकर म्हणाले, या सरकारची धोरणे शेतकर्‍यांना मारक असून उद्योजकांना मदत करणारी आहेत.शेतकर्‍यांना  दुधाला पाच रुपये अनुदान  दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. सरकारने हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. कोणी सूर्याजी पिसाळ होऊन पोलीस संरक्षणात दूध घालण्याचा प्रयत्न  केला तर ते खपवून घेतले जाणार नाही. शेतकरी संघटनेला  चंद्रकांत पाटील यांनी आंदोलने शिकवू नयेत.आमच्यावर 84 पोलीस केसेस आहेत.राज्यात मोठ्या प्रमाणात दूध शिल्लक राहत असताना बाहेरील राज्यातील दूध कशासाठी घेतले जाते याचे उत्तर सरकारने द्यावे.

दूध भुकटी करणार्‍या कंपन्यांना 53 कोटी अनुदान सरकारने दिले.त्याऐवजी सर्वसामान्य दूध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान देने गरजेचे होते.सर्वच दूध उत्पादकांना लिटरला पाच रुपये अनुदान दिल्यास शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च निघेल. दिवाळीपर्यंत हे अनुदान द्यावे. ही मागणी सरकारने पूर्ण न केल्याने आंदोलन करावे लागत आहे. गांधीजींच्या मार्गाने सांगू परंतु तरीही फरक न पडल्यास भगतसिंग यांच्याच भाषेत सांगावे लागेल. शेतकर्‍यांचे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात राडा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला. यावेळी दूध डेरी मालक,शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.