Wed, Feb 26, 2020 22:22होमपेज › Satara › परतीच्या पावसाने दाणादाण; नद्या, तलाव तुडुंब

परतीच्या पावसाने दाणादाण; नद्या, तलाव तुडुंब

Published On: Sep 25 2019 1:47AM | Last Updated: Sep 24 2019 10:11PM
खटाव : प्रतिनिधी

सोमवारी मध्यरात्रीनंतर खटाव तालुक्याच्या उत्तर भागात  झालेल्या तुफान पावसाने बि—टीशकालीन नेर धरण तब्बल सात वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरुन मंगळवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले. धरणातून इतिहासातील पहिलाच सर्वात मोठा दोन फूट तीन इंचांचा विसर्ग सुरु झाल्याने येरळा नदीला मोठा पूर आला आहे.  तालुक्यातील सर्वात मोठे येरळवाडी धरणही  भरल्याने दुष्काळी जनतेला चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

दुष्काळी खटाव तालुक्याला गेल्या आठवड्यात वादळी पावसाने झोडपून काढले होते. त्या पावसाने नेर आणि येरळवाडी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला होता. सोमवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा खटाव तालुक्याला तुफान पावसाने झोडपून काढले. तालुक्याच्या उत्तर भागातील बुध मंडलात तब्बल 61.30 मिमी पाऊस झाल्याने नेर धरण मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरले. धरणात 416.40 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला.

पावसाचा जोर इतका होता कि धरणाच्या सांडव्यावरुन दोन फूट तीन इंचांचा मोठा विसर्ग सुरु होता. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने येरळा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले आहे. नागनाथवाडी येथील मंदिराला पस्तीस वर्षानंतर येरळेचे पाणी टेकले. खटाव येथील नवीन पूलालाही येरळेचे पाणी स्पर्श करुन वाहत होते. नदीकाठच्या सर्वच गावातील लोकांनी पाणी पहाण्यासाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी नागरीकांनी येरळेच्या पाण्याचे खणानारळाने ओटी भरुन पूजन केले. 

तालुक्याच्या बहुतांश भागाची तहान भागवणार्‍या 1158.30 दशलक्ष घनफूट म्हणजेच  1.15 टीएमसी क्षमतेच्या येरळवाडी धरणातही पाण्याची मोठी आवक झाली. धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओव्हरफ्लो झाल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. 

नेर आणि येरळवाडी धरणे भरल्याने त्या भागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकर्‍यांना आता रब्बी हंगामही हाताशी लागणार आहे. येरळा नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजना आता बराच कालावधी तग धरणार असल्याने टंचाईचे सावट दूर होणार आहे.    

येरळा नदीवरील पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प

जोरदार पाऊस तसेच नेर धरणातून होणार्‍या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे येरळा नदीला पूर आला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावोगावची वाहतूक ठप्प झाली होती. नदीपात्रातील कोल्हापूर पध्दतीचे सर्व बंधारे भरले आहेत. नदीकाठच्या विहीरींच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.