Fri, Jun 05, 2020 12:26होमपेज › Satara › आमदार, खासदार निधीच्या कामांवर निर्बंध

आमदार, खासदार निधीच्या कामांवर निर्बंध

Published On: Sep 27 2019 2:18AM | Last Updated: Sep 27 2019 2:18AM
सातारा : प्रतिनिधी

आगामी निवडणुका समोर ठेवून सरकारे किंवा सत्‍ताधारी पक्ष निर्णय घेत असतात. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही भाष्य घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने करता येत नाही. धोरण जाहीर करणे, उद्घाटने, आढावा घेणे यावर निर्बंध घातले असून आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय निवडणूक होत असलेल्या कोणत्याही भागात नव्याने योजना राबवता येत नाही. खासदारांचा स्थानिक क्षेत्र विकास निधी तसेच आमदारांचा स्थानिक विकास निधीतून कोणतेही कंत्राट देता येणार नसल्याचे निर्बंध आचारसंहितेत लागू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची जिल्हा प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरु आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके राजकीय व्यक्‍ती, कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.  आदर्श आचारसंहितेमध्ये शासनाने केलेल्या घोषणा किंवा आमदार, खासदार निधीतून करण्यात येणार्‍या कामांच्या अनुषंगाने काही बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. पूर्वी घेतलेल्या निर्णयावर आचारसंहिता काळात कोणतेही भाष्य करता येत नाही. कोणत्याही विशिष्ट योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, योजनेस यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे, राज्यपालांच्या किंवा मंत्र्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात योजनेचा निर्देश करण्यात आला होता, केवळ यावरुन याचा अर्थ असा नाही की, आचारसंहिता अंमलात असतेवेळी निवडणुका जाहिर झाल्यानंतर अशा योजना जाहीर करता येऊ शकतात किंवा त्याचे उदघाटन करता येऊ शकते किंवा अन्य प्रकारे त्या हाती घेता येऊ शकतात. अशा बाबींवरुन त्यांचा मतदारांवर प्रभाव पडण्याचा इरादा स्पष्ट असल्याने अशी कृती जर घडली तर  आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे समजण्यात येणार आहे.

आचारसंहिता काळात शासकीय योजनांना नव्याने मंजुरी देता येत नाही. लाभादी योजना जरी चालू असल्या तरी राजकीय व्यक्‍तींकडून घेण्यात येणारा आढावा व लोभाभिमुख योजनांचे संस्करण निवडणुका पूर्ण होईपर्यंत थांबवावे लागते. निवडणूक घेण्यात येत असलेल्या कोणत्याही भागात आयोगाच्या पूर्व परवानगी शिवाय कल्याणकारी योजना व बांधकामे याकरीता नव्याने निधी देऊ नये किंवा बांधकामाचे कंत्राट देऊ नये. जर कोणतीही योजना राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली असेल तर, संसद सदस्य (राज्यसभेच्या सदस्यांसह) स्थानिक क्षेत्र विकास निधी किंवा विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य स्थानिक विकास निधी याखालील कामाचा देखील यात समावेश होतो.  या योजनांतून करण्यात येणार्‍या कामांसाठी आमदार, खासदार फंडातून निवडणूक काळात निधी उपलब्ध करुन देता येत नाही.  असा कुठे प्रकार घडल्यास त्यावर आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कारवाई केली जाणार आहे. 

(क्रमश:)