Thu, Mar 21, 2019 15:25होमपेज › Satara › झाड तोडणे हा कार्योत्तरचा विषय आहे का?

झाड तोडणे हा कार्योत्तरचा विषय आहे का?

Published On: Jan 19 2018 2:00AM | Last Updated: Jan 18 2018 10:15PMकराड : प्रतिनिधी 

कोल्हापूर नाक्यावर तोडलेली झाडे स्मशानभूमीकडेला लावण्याचे काम सुरू असताना पालिका अधिकार्‍यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पालिका अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. कोणत्या कामाला कार्योत्तर मंजुरी घ्यायची असते, याचे तुम्हाला ज्ञान आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करत काहीही उत्तरे देऊ नका, हा कार्योत्तरचा विषय आहे का? अशा शब्दात पाटील यांनी अधिकार्‍यांना झापले.

नगरअभियंता एम. एच. पाटील यांनी कोल्हापूर नाक्यावर तोडलेली झाडे स्मशानभूमी परिसरात पुन्हा लावण्याचे काम सुरू असल्याचे सौरभ पाटील, पर्यावरणप्रेमी रोहन भाटे, नाना खामकर यांच्यासह रिक्षा चालक नागेश कुर्ले व त्यांच्या सहकार्‍यांना सांगितले. त्यानंतर ते सर्वजण स्मशानभूमीकडे गेले. त्याठिकाणी झाड पाहून ते पुन्हा लावण्यासाठी ज्या पद्धतीने ते मुळ्यांसह काढणे आवश्यक होते, त्याकडे दुर्लक्ष केल्याचे भाटे, खामकर यांनी यावेळी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.

सकाळी सात वाजता झाड तोडण्याची गडबड का करण्यात आली? झाड काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही का करण्यात आली नाही? असे प्रश्‍न सौरभ पाटील यांनी उपस्थित करताच या विषयाला कार्योत्तर मंजुरी घेतली जाणार असल्याचे शिक्रे यांनी सांगितले. त्यावर सौरभ पाटील, रोहन भाटे तसेच रिक्षा चालक नागेश कुर्ले यांचा पारा चांगलाच चढला. सौरभ पाटील यांनी शिक्रे यांना काहीही उत्तरे देऊ नका, असे सुनावत अक्षरश: झापले. तसेच एम. एच. पाटील यांना सौरभ पाटील यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर शिक्रे यांनी नमते घेत यापुढे असे होणार नाही, काळजी घेऊ असे सांगत वेळ मारून नेली. 

लगेच कायदा हातात घेऊ नका ...

आम्ही मुलांप्रमाणे वाढवलेली झाडे मात्र सर्व नियमांना तिलांजली देत तोडले, अशा शब्दात रिक्षा चालकांनी भावना व्यक्त केल्या. तसेच याप्रश्‍नी गुन्हा नोंद न झाल्यास रास्तारोको करू, असा इशारा त्यांनी दिला. यावर सौरभ पाटील यांनी एक ते दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास तुम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. प्रशासनाला थोडी मुदत द्या, मीही तुमच्यासोबत या लढ्यात सहभागी आहे, अशी ग्वाही दिली. 

वृक्ष प्राधिकरणाची पाच महिन्यात बैठकच नाही...

वृक्ष प्राधिकरण समिती पहिल्यापासून वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. राजकीय पुनर्वसनासाठी या समितीचा वापर केल्याचा दावा लोकशाही आघाडीने केला होता. या समितीचे सदस्य असणार्‍या जालिंदर काशिद यांनाही या प्रकाराची कल्पना नव्हती. तर काशिद वगळता अन्य सदस्य राजकीय पार्श्‍वभूमीचेच आहेत. सप्टेंबरपासून समितीची बैठकच झाली नसल्याचे सांगत काशिद यांनी हतबलता आणि संताप व्यक्त केला.