Fri, Jul 19, 2019 13:30होमपेज › Satara › महावितरणबाबत समस्या तातडीने सोडवू

महावितरणबाबत समस्या तातडीने सोडवू

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

निधीअभावी शेती पंपांना वीज कनेक्शन दिले जात नाही. अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने शेताला पाणी नाही. अपुरे अधिकारी आणि कर्मचार्‍यांमुळे लोकाभिमुख काम होत नाही. या सर्व समस्या तातडीने सोडवून सातारा- जावली मतदारसंघातील शेतकरी आणि जनतेची गैरसोय थांबवा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महावितरणचे प्रकल्प संचालक गिरीश साबू यांच्याकडे केली. याबाबत प्रश्‍न तातडीने सोडवू, अशी ग्वाही साबू यांनी बैठकीत दिली. 

कृष्णानगर येथे महावितरणच्या कार्यालयात प्रकल्प संचालक साबू बैठकीसाठी आले होते. त्यावेळी सातारा- जावली मतदारसंघातील वीज वितरणसंदर्भातील समस्यांसंदर्भात आ. शिवेंद्रराजे यांनी साबू यांची स्वतंत्र भेट घेतली. यावेळी साबू यांच्यासह बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, सातारा जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता संजय साळे, कार्यकारी अभियंता सुनिलकुमार माने आदी अधिकारी उपस्थित होते. 

सातारा, जावली तालुक्यात असंख्य शेतीपंप कनेक्शन रखडली आहेत. यामुळे विहिरीत पाणी आणि मोटार असूनही केवळ विद्युत कनेक्शन नसल्याने शेतकर्‍यांच्या शेताला पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी करण्यात आली आहे. मात्र नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले जात नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीपंपांची कनेक्शन तातडीने द्यावीत. मागणीच्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर त्वरित बसवावेत, सातारा-जावली मतदारसंघातील गंजके खांब तातडीने बदलावेत व लोंबकळणार्‍या तारांचाही बंदोबस्त करावा. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे तातडीने सेवा उपलब्ध होत नाही. महावितरणचे काम लोकाभिमुख होण्यासाठी अभियंत्यांच्या रिक्त जागा भराव्यात व आवश्यकतेनुसार कर्मचार्‍यांची नेमणूक करावी आदी मागण्या आ. शिवेंद्रराजे यांनी केल्या. 
यावर सर्व मागण्या रास्त  असून त्याची पुर्तता करण्यासाठी प्रयत्न करु. सरकार कर्ज रोखे उभारणार असल्याने निधी उपलब्ध होईल. त्याद्वारे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. एच. व्ही. डी. एस. माध्यमातून शेतीपंप कनेक्शन देण्याचा प्रयत्न तातडीने केला जाणार आहे. महावितरणशी निगडीत सर्व प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्‍वासन साबू यांनी आ. शिवेंद्रराजे यांना दिले.