Sat, Jul 20, 2019 08:59होमपेज › Satara › शहिद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी संग्रहालय उभारणीचा संकल्प

शहिद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी संग्रहालय उभारणीचा संकल्प

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:01PM

बुकमार्क करा

म्हसवड : प्रतिनिधी

भारतीय सैन्य दलातील शहिद जवानांच्या स्मृती निरंतर जपण्यासाठी वस्तू संग्रहालय वजा स्मारक  उभारणीचा संकल्प माणदेशी फौंडेशन संस्थेच्या वतीने केला जात असून याबाबतची घोषणा संस्थापिका श्रीमती चेतना सिंन्हा यांनी केली. 

यावेळी माणदेशीच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेखा कुलकर्णी, माणदेशी चॅम्पियन अध्यक्ष प्रभात सिन्हा, स्वप्नील कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. चेतना सिन्हा म्हणाल्या, नुकतीच जम्मू-काश्मिर येथून विकास मनहास यांनी माणदेशी फाऊंडेशनला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी खडतर परिस्थितीत शत्रूपासून मायभूमीचे रक्षण करणार्‍या सैन्यांची शौर्य गाथा सांगितली. ती ऐकून अंगावर शहारे आले. कर्तव्य बजावताना कितीतरी जवान दरवर्षी शहिद होतात. पण त्या बलिदानाचा हळूहळू विसर पडत जातो. म्हणूनच फाऊंडेशनने शूर जवानांचे वस्तू संग्रहालय वजा स्मारक उभारणीचा संकल्प केला आहे. त्यामुळे शूरवीरांच्या स्मृती लोकांच्या हृदयात घर करून राहतील. 

त्यांचे शौर्य, बलिदान यांची जाणीव तरूणांना होवून ते देशसेवेसाठी प्रेरीत व्हावेत, हीच यामागची इच्छा आहे.आजची पिढी इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहे. त्यांना सैन्य दल, हवाई दल व नौदलाबद्दल माहितीही संग्रहालयाच्या माध्यमातून होणार आहे. माणदेशीयांनी व शहिदांच्या कुटुंबियांनी वीर जवानांबद्दल माहिती देऊन सहकार्य करावे. त्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यालय अथवा नजीकच्या शाखेत संपर्क करावा, असे आवाहन माणदेशी फौंडेशनच्या संस्थापिका श्रीमती सिन्हा यांनी केले आहे.