Mon, Jun 17, 2019 19:07होमपेज › Satara › सातारा पालिकेत मराठा आरक्षणाचा ठराव

सातारा पालिकेत मराठा आरक्षणाचा ठराव

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला. मराठा आरक्षणाच्या विषयावर सर्व पक्ष गटतट बाजूला ठेवून एकत्र आले. यावेळी नगरसेवकांनी मराठा आंदोलनात बलिदान देणार्‍या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.  अनिश्चित कालावधीसाठी सभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणावर ठरावाचा निर्णय घेवून सातारा नगरपालिकेने राज्यासमोर आदर्श ठेवला.

सातारा नगर पालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी सभागृहात  नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. सभेच्या अजेंड्यावर 13 विषय चर्चेसाठी घेण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीला मराठा क्रांती मोर्चात बलिदान देणारे कार्यकर्ते काकासाहेब शिंदे आणि बंडू सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याचवेळी नगर विकास आघाडीचे सभागृह नेते अमोल मोहिते  यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. नुसती श्रद्धांजली नको, पाठिंबा द्या. ही सभा स्थगित करुन  मराठा आरक्षणाचा ठराव घ्या. आरक्षणाचा हा ठराव मुख्यमंत्र्यांकडे पाठवा, अशी मागणी मोहितेंनी केली. सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अ‍ॅड. डी. जी.  बनकर म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभर लाखोंचे 58 मोर्चे काढले.

सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. इतर समाजांप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. राज्याच्या विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे. आरक्षण नसल्यामुळे समाजातील तरुणांना कोणताही लाभ मिळत नाही. सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. मराठा आरक्षणासाठी समाजातील तरुणांनी बलिदान दिले आहे. त्यांचा हा त्याग व्यर्थ जाता कामा नये. या समाजाला आरक्षणाची गरज आहे. मोहिते यांनी चांगला प्रस्ताव मांडला. मराठा आरक्षणाला सातारा पालिकेचा पाठिंबा आहे. सातार्‍याचे  प्रतिनिधीत्व करणार्‍या या सभेत मराठा आरक्षणाचा एकमुखी ठराव घ्यावा. सभेचे कामकाज पुढील सुचनेपर्यंत तहकूब ठेवावे, अशी मागणी केली.

भाजप नगरसेवक धनंजय जांभळे म्हणाले, सातारा नगरपालिकेने मराठा आरक्षणाचा ठराव घेऊन इतिहास घडावा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजप मंत्र्यांनी पाठिंबा  दिला आहे. मराठा आरक्षणाचा ठराव घेवून राज्यासमोर आदर्श ठेवावा, अशी मागणीही जांभळे यांनी केली. 

विरोधी पक्षनेते अशोक मोने म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मोर्चे निघत आहेत. आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुणांनी बलिदान दिले. सातारा पालिकेने मराठा आरक्षणाचा ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवावा. सभेचे काम तहकूब ठेवावे, अशी मागणीही मोने यांनी केली. 

नगराध्यक्षा सौ. माधवी कदम म्हणाल्या, मराठ्यांची राजधानी म्हणून सातार्‍याची ओळख आहे. सत्‍ताधारी आघाडीसह इतर आघाड्या व पक्षांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे.   मराठा आरक्षणाला सातारा नगरपालिकेचा संपूर्ण पाठिंबा आहे. शिवाय मराठा आरक्षणासाठी ठराव घेऊन शासनाला पाठवला जाईल. सभेचे कामकाज तहकूब करत असल्याचे सौ. कदम यांनी जाहीर केले. सभागृहात घेण्यात आलेल्या या निर्णयाचे नगरसेवकांनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा या घोषणेने सभागृह दणाणून सोडले.  मराठा आरक्षणाच्या ठरावावर सर्व नगरसेवकांचे एकमत झाले. गट-तट बाजूला ठेवून सर्व नगरसेवक एकत्र आले.  मोने आणि लेवे यांची दुश्मनीही विरघळली. जय- विरुच्या या जोडीने सभागृहात एकमेकांना आलिंगन दिले.