Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Satara › शेतकरी संपास बळीराजा संघटनेचा विरोध

शेतकरी संपास बळीराजा संघटनेचा विरोध

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 11:42PMकराड : प्रतिनिधी 

गेल्यावर्षी संपाचे हत्यार उपसल्यानंतर किसान सभेकडून यावर्षी पुन्हा शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी 1 जूनपासून संप जाहीर करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी याबाबतची भूमिका नुकतीच कराडमध्ये जाहीर केली आहे. मात्र संपामुळे शेतकर्‍यांचेच आर्थिक नुकसान होत असून शेतकर्‍यांना बसणारा फटका लक्षात घेत बळीराजा शेतकरी संघटना या संपापासून चार हात लांबच राहणार आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अद्याप ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही.

गेल्यावर्षी पुणतांबा येथून शेतकरी संपाला प्रारंभ करत त्याचे लोण संपूर्ण राज्यभर पोहचले होते. मात्र संप यशस्वी होत असतानाच ज्या पद्धतीने घाईघाईत निर्णय घेत संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते, त्यावरून मतभेद होऊन डॉ. अजित नवले यांच्यासह त्यांच्यासह काही सहकारी बाजूला गेले आहेत. आता डॉ. अजित नवले यांच्यासह त्यांचे सहकारी शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून 1 जूनपासून पुन्हा संप जाहीर करण्यात आला आहे.

.याच पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात विशेषत: कराड तालुक्यात काय अवस्था असेल? याची चाचपणी केली असता शेतकरी संघटनांमधील मतभिन्नता पुन्हा समोर आली आहे. शेतकरी संपाबाबत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शेतकरी संपाबाबत सारासार विचार होणे आवश्यक आहे. संपात सहभागी झाल्यास शेतकर्‍यांनाच मोठी आर्थिक झळ सहन करावी लागते, असा आमचा अनुभव आहे. 

संपात सहभागी होत भाजीपाला शेतात कुजत ठेवायचा का? शेतकर्‍यांने दूध डेअरीला न घालता त्याचे काय करायचे? असे प्रश्‍न उपस्थित करत शेतकरी अगोदरच संकटात सापडला आहे. संपामुळे आणखी नवीन अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शेतकर्‍याचे नुकसान होईल, अशा कोणत्याही गोष्टीला बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा नसल्याची भूमिका पंबाजराव पाटील यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना जाहीर केली आहे.

त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांच्याशी या विषयावर संपर्क साधला असता त्यांनी अद्यापही खा. राजू शेट्टी यांच्याशी या संपाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही. खा. शेट्टी यांच्याशी चर्चा करूनच त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कार्यवाही करणार असल्याचे नलवडे यांनी स्पष्ट केले आहे. कराड तालुक्यात स्वाभिमानी व बळीराजा या दोन्ही शेतकरी संघटना प्रबळ आहेत. बळीराजा संपात सहभागी होणार नाही, तर स्वाभिमानीनेही या विषयाबाबत भूमिका निश्‍चित केलेली नाही. त्यामुळेच 1 जूनपासूनच्या संपाला जिल्ह्यात विशेषत: कराड तालुक्यात कसा प्रतिसाद मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags ; Satara, Resist, Farmer, movement,  Baliraja Sangh