Tue, Jun 25, 2019 21:47होमपेज › Satara › द्वैवार्षिक तपासणीबाबत ग्राहक उदासिनच

द्वैवार्षिक तपासणीबाबत ग्राहक उदासिनच

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:49AMकराड : चंद्रजित पाटील

घरगुती गॅस कनेक्शनची दर दोन वर्षांनी नियमितपणे तपासणी होणे आवश्यक आहे. याशिवाय गॅस कंपनीकडून घातलेल्या अन्य अटींची व शर्थीचे पालन केले तरच अपघातानंतर ग्राहकांना विमा योजनेचा लाभ मिळतो. मात्र जवळपास 70 ते 80 टक्के ग्राहक नियमीत तपासणीबाबत निष्काळजीपणा दाखवतात. त्यामुळे ग्राहकांमध्ये तपासणीबाबत जागरूकता होणे आवश्यक असून ही जागरूकता निर्माण करण्यात गॅस वितरकही अनेकदा कमी पडतात, हे नाकारून चालणार नाही.

गेल्या महिन्यात शिवजयंतीदिनी कराडमधील चावडी चौकात बंद हॉटेलमध्ये स्फोट झाला होता. त्यानंतर या परिसरात झालेली वित्त हानी सर्वांनाच माहिती आहे. पोलिसांकडून गॅस गळतीमुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जात असला तरी आजही या घटनेबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळेच गॅस गळतीची शक्यता लक्षात घेता आपला निष्काळजीपणा आपल्याच अथवा आपल्या नातेवाईकांच्या जीवावर कसा बेतू शकतो? हेच या घटनेतून समोर आले आहे.

केवळ 90 रूपयांसाठी.. 
घरगुती गॅसची दर दोन वर्षांनी तपासणी करून घेणे आवश्यकच आहे. मात्र अनेेकदा गॅस एजन्सीकडून अशी तपासणी करण्याचा प्रयत्न झाला असता ग्राहकांकडून गैरसमजातून अथवा अज्ञानातून गॅस वितरकांवरच पैसे उकळले जात असल्याचा आरोप होतो. काही ठिकाणी असे होतही असेल, मात्र तपासणीबाबत माहिती व  फी जाणून घेत गॅस एजन्सीच्या तज्ज्ञ माणसाकडून तपासणी करून त्याबाबतचा अर्ज भरून घेणेच सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे. मात्र अशी तपासणी केवळ 20 ते 30 टक्के ग्राहकही करून घेत नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत गॅसकडून केवळ 90 रूपये तपासणी  फी आकारली जाते. अन्य गॅस कंपन्यांचीही तपासणी फी या दरम्यानच आहे. मात्र त्यामुळेच 90 ते 100 रूपयांसाठी आपण आपल्या नातेवाईकांचा जीव धोक्यात घालायचा की नाही? यावर प्रत्येकानेच विचार करण्याची आवश्यकता आहे.

टाकी फेकणे अयोग्यच... 
घरगुती सिलेंडरची डिलीव्हरी करण्यासाठी ग्रामीण भागात गॅस एजन्सीकडून टेम्पोसारख्या वाहनांचा उपयोग होताना दिसतो. अनेकदा गॅस एजन्सीचे कर्मचारी गाडीतून भरलेला गॅस रस्त्यावर टाकतात आणि ग्राहकही हे बिनधास्तपणे पहात असतो. मात्र हे धोकादायक असून ग्राहकांसह गॅस एजन्सी कर्मचार्‍यांनी याबाबत योग्य ती दक्षता घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे. त्याचबरोबर सिलेंडरमधून गॅस गळती होणार नाही, हेही पडताळून पाहणे आवश्यक आहे.

हा संशोधनाचाच विषय
घरगुती सिलेंडरवर डिलीव्हरी देताना वजन काट्यावर टाकीचे वजन तपासावे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले असते. डिलीव्हरी देणार्‍याकडे वजन काटा असणे आवश्यक आहे. मात्र वजन तपासून घेण्याबाबत ग्राहक नेहमीच उदासिन असतात आणि डिलीव्हरी देणार्‍याकडे वजन काटा असतो की नाही? हाही संशोधनाचाच विषय आहे.