Sun, May 26, 2019 01:17होमपेज › Satara › जिल्ह्यात दहा वर्षांतला विक्रमी पाऊस

जिल्ह्यात दहा वर्षांतला विक्रमी पाऊस

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:57PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस नसला, तरी उर्वरित तालुक्यांत जुलै महिन्यापर्यंतची सरासरी पावसाने ओलांडली आहे. या महिन्यात पडलेला पाऊस हा दहा वर्षांच्या तुलनेत  सर्वाधिक  आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा 234.43  मि.मी. विक्रमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार 67.62 टक्के जादा पाऊस झाला आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सलग कोसळणार्‍या पावसामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी वाफसा न आल्याने पेरणीची कामे खोळंबली. जिल्ह्यातील धरणे निम्म्याहून अधिक भरली. काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले. कोयनेतून सध्या 15 हजार  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्याचबरोबर मोरणा धरणातून 3 हजार 510 तर महू धरणातून 1 हजार 191 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. बुधवारी दुपारी उरमोडी कॅनॉल वीजनिर्मितीमधून 450 क्युसेक तर धोम बलकवडीतून 1 हजार 435 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

गतवर्षीच्या तुलनेत धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी 18 जुलैपर्यंत कोयना धरण 45.37 टक्के भरले होते. यावर्षी धरणात 74.74 टीएमसी  पाणी असून धरण 74.65  टक्के भरले आहे. कण्हेर धरणात 9.59 टीएमसी पाणी असून गतवर्षी धरणात 3.83 टीएमसी पाणी होते. 73.62 टक्के धरण भरले आहे. धोम-बलकवडी प्रकल्पात सध्या 3.96 टीएमसी पाणी असून गतवर्षी 1.90 टीएमसी पाणी होते. मागील तुलनेत उरमोडी, तारळी या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात यावर्षी वाढ झाली आहे.  मोरणा, उत्‍तरमांड व हातगेघर या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक यावर्षी वाढली. मात्र, नागेवाडी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात फारसा बदल झाला नाही. तशीच परिस्थिती येरळवाडी धरणाची आहे. या धरणात अद्यापही पाणी आलेले नाही.  जिल्ह्यातील या 12 मध्यम व लघु पाणी प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. सातार्‍यास पाणीपुरवठा करणारा कास तलाव तसेच महाबळेश्‍वरास पाणीपुरवठा करणारा वेण्णा लेक भरुन वाहू लागले आहेत. 

जिल्ह्यातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये सातारा- 205.72 मिमी, जावली-158.68 मिमी, पाटण-94.09 मिमी, कराड-134.67 मिमी, कोरेगाव 10.96 मिमी, खटाव 123.82 मिमी, खंडाळा-76.38 मिमी तर  वाई तालुक्यात सरासरीपेक्षा जादा 91.55 मिमी जादा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. माणमध्ये 13.07 टक्के तर फलटणमध्ये 6.83 मिमी कमी पाऊस पडल्याची नोंद झाली. मागील दहा वर्षांच्या तुलनेत जुलै महिन्यापर्यंत सर्वाधिक पाऊस यावर्षी झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात यावर्षी 18 जुलैपर्यंत 548.38 मिमी पाऊस झाला. गतवर्षी जुलैअखेरीस जिल्ह्यात एकूण 406.2 मिमी पाऊस झाला होता. जुलै, 2016 मध्ये 522 मिमी एकूण पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात जुलै, 2015 मध्ये 359.7 मिमी एकूण पाऊस झाला होता. जुलै, 2014 मध्ये 235.7 तर जुलै, 2013 मध्ये 403.3 मिमी पावसाची नोंद  करण्यात आली. त्यापूर्वीही पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले. त्यामुळे जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. 

गेल्या दहा वर्षांमध्ये एक-दोन वर्षांचा अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झाला नाही. यावर्षी मात्र पावसाने गेल्या दहा वर्षांतील विक्रम मोडून काढले. जिल्ह्यात आतापर्यंत 167 टक्के अतिरिक्‍त पाऊस झाला आहे.