Sun, Nov 18, 2018 20:09होमपेज › Satara › नागेवाडी येथील बैलबाजार इतिहास जमा

नागेवाडी येथील बैलबाजार इतिहास जमा

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:08PM

बुकमार्क करा
लिंब : प्रवीण राऊत 

नागेवाडी, ता. सातारा येथील  शाकंभरी देवीच्या नवरात्र उत्सव यात्रेनिमित्त गेल्या काही वर्षांपासून भरवण्यात येत असलेला बैल बाजार इतिहासजमा झाला अहे. बैल बाजाराचे अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्यानंतरही हा बाजार बंद झाल्याने शेतकर्‍यांना हूरहूर लागून राहिली आहे. 

सातारा तालुक्यातील महामार्गालगत पुरातन असलेल्या श्री शाकंभरी देवीची यात्रा शाकंभरी नवरात्रात भरत असते. या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी नागेवाडी येथील खाशाबा सावंत, गणपत सावंत, यशवंत सावंत, बडे घेवडा  तसेच लिंब येथील रामू बाळा सावंत यांनी 1984 साली आपली बैले मंदिर परिसरातील शेतात बांधून बैल बाजाराची सुरवात केली. दोन बैलांनी सुरुवात केलेल्या या बैल बाजारात काही वर्षातच सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बैल व्यापार्‍यासह शेतकरी आपले बैल खरेदी - विक्री करण्यासाठी येऊ लागले. त्यामुळे या यात्रेस मोठी गर्दी होऊन यात्रेची शोभा वाढू लागली. 

बैल बाजारात बैल खरेदी- विक्री च्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने बैल खरेदी - विक्रीसाठी येत असत. हे गर्दीचे ठिकाण झाल्यामुळे नामवंत तमाशे करमणुकीसाठी येत तसेच अनेक मोठी हॉटेल्स, मिठाईवाले, दुकानदार आपली दुकाने थाटत असल्याने यात्रेला वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.

दरम्यान, शेतकर्‍यांचे शेतातील यांत्रिकीकरणामुळे सर्वत्र बैलांचे प्रमाण कमी होऊ लागले. शेतकामासाठी ट्रॅक्टरचा सर्रास वापर होऊ लागल्याने बाजारावर परिणाम होऊ लागला आहे. बाजारातील बैल खरेदी विक्रीचे प्रमाण कमी झाल्याने तीन-चार वर्षांपासून या बैल बाजाराकडे शेतकर्‍यांसह बैल व्यापारीही फिरकेनासे झाले आहे. त्यामुळे बैलबाजार इतिहास जमा झाला असल्याचे दिसत आहे.