Tue, Feb 19, 2019 22:42



होमपेज › Satara › आरटीओ कार्यालयातून पावती पुस्तके गायब

आरटीओ कार्यालयातून पावती पुस्तके गायब

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AM



कराड : प्रतिनिधी

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) आठ कराची पावती पुस्तके गायब करून त्यातील पावत्यांद्वारे लोकांकडून पैसे गोळा केल्याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी (दि. 12) उघडकीस आला. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यांशी चर्चा करून रात्री उशिरा गुन्हा दाखल  करण्याची कार्यवाही सुरु केली होती. दरम्यान, आरटीओ अधिकार्‍यांनी तिघांवर संशय व्यक्‍त केला असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केल्याचे जाधव यांनी सांगितले.

येथील आरटीओ कार्यालयात करासाठी वापरण्यात येणारी  आठ पावती पुस्तके सुमारे वर्षभरापुर्वी गायब झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर  अजित शिंदे यांनी चौकशी  करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुमारे आठ पुस्तके गायब असून त्यातील अंदाजे 56 पावत्या झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. याबाबत त्यांनी कार्यालयांतर्गत सखोल चौकशी केली असता त्यात काही संशयीतांची नावे समोर आली. 

चोरीला गेलेल्या पुस्तकातील पावत्या दिल्या आहेत. मात्र, त्याचे पैसे शासनाकडे जमा नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी संशयीतांकडून माहिती घेतली असता हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर आरटीओ अधिकारी अजित शिंदे, निळकंठ पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रमोद जाधव यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.  

याबाबत पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आरटीओ कार्यालयातील कराची पावती पुस्तक गायब आहेत. त्याबाबत तक्रार घेण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षाची आठ पावती पुस्तके गहाळ असल्याची बाब लक्षात येताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी तक्रार दिली आहे.