Sat, Apr 20, 2019 18:44होमपेज › Satara › पुण्यातील व्यावसायिकासह साताऱ्यातील पैलवानांवर खंडणी प्रकरणी गुन्हा

पुण्यातील व्यावसायिकासह साताऱ्यातील पैलवानांवर खंडणी प्रकरणी गुन्हा

Published On: Jun 26 2018 5:37PM | Last Updated: Jun 26 2018 5:37PM
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील मुनीर अब्‍दुलगैब पट्टणकुडे यांचे अपहरण करून २१ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी विकास बाळासाहेब म्‍हस्‍के (रा. सिंहगडरोड, पुणे) याच्यासह पैलवानांवर खंडणीचा गुन्‍हा दाखल झाला आहे. अन्य संशयित पैलवान हे सातार्‍यातील असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

मुनीर पट्टणकुडे हे पत्नी फरजाना व इतर कुटुंबीयांसमवेत राहत आहेत. २०१६ मध्ये पट्टणकुडे यांची पुणे येथील सिंहगडरोडवर राहणार्‍या म्हस्के याच्याशी शासकीय एलईडी बल्ब विक्रीच्या कारणावरुन ओळख झाली. म्हस्के याने ५ लाख रुपये डिपॉझीट भरुन एजन्सी घ्या, असे पट्टणकुडे यांना सांगितले. एवढे पैसे देणे शक्य नसल्याने पट्टणकुडे यांनी एजन्सी घेण्यास नकार दिला. यानंतर म्हस्के याने कमिशन बेसीसवर बल्ब विकण्यास पट्टणकुडे यांना दिले होते. बल्ब विक्रीतून आलेली अडीच लाख रुपयांची रक्कम पट्टणकुडे यांनी बडोदा येथील हेलेक्स या कंपनीच्या खात्यावर वेळोवेळी भरली.

बल्ब विकल्यानंतर त्यापोटी २५ टक्के कमिशनप्रमाणे पट्टणकुडे यांनी म्हस्के याच्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी म्हस्के याने बल्ब विकलेल्या ग्राहकांची यादी व त्यांची लाईटबिले जमा केल्याशिवाय कमिशन देणार नाही, असे पट्टणकुडे यांना सांगितले. बल्ब विकताना अशी कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याच्या कारणावरुन पट्टणकुडे व म्हस्के यांच्यात वाद झाला. या वादानंतर म्हस्के हा वारंवार फोन करुन पट्टणकुडे यांच्याकडे लाईटेबिले जमा केली नसल्याने २१ लाख रुपयांचे नुकसान झाले असून ते भरुन देण्याची मागणी वारंवार करु लागला.

विकलेल्या बल्बचे कमिशन देण्याऐवजी म्हस्के २१ लाख रुपये मागत असल्याने पट्टणकुडे हे त्रस्त झाले होते. १४ फेब्रुवारी नंतरच्या काळात म्हस्के हा पट्टणकुडे यांच्या घरी जावून वारंवार कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत २१ लाखांची मागणी करु लागला. यासाठी  म्हस्के याने सातार्‍यातील काही पैलवानांची मदतही घेतली. वारंवार होत असलेल्या या त्रासामुळे पट्टणकुडे कुटुंबीय कंटाळले होते.

२४ जून रोजी सकाळी म्हस्के याने पट्टणकुडे यांना फोन करुन तालीम संघाजवळ बोलावून घेतले. त्यानुसार पट्टणकुडे हे स्वीफ्ट कारमधून गेले. यावेळी म्हस्के सोबत अनोळखी पैलवान होते. म्हस्के याने पैलवानांच्या मदतीने पट्टणकुडे यांना त्यांच्याच स्वीफ्ट कारमधून बॉंबे रेस्टॉरंट चौकात नेले. याठिकाणी म्हस्के याने तुला दिलेली वेळ संपली असून २१ लाख रुपये न दिल्यास कुटुंबीयांसोबत जीवे मारण्याची धमकी दिली.

याठिकाणाहून सुटका करुन घेत पट्टणकुडे हे घरी परतले. कुटुंबीयांसोबत त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून म्हस्केसह अनोळखी पैलवानांविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरुन संशयितांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.