Wed, Feb 20, 2019 03:19होमपेज › Satara › रामराजे तर मला गुरूंसारखे : उदयनराजे (Video)

रामराजे तर मला गुरूंसारखे : उदयनराजे (Video)

Published On: Sep 04 2018 12:01AM | Last Updated: Sep 04 2018 1:19AMफलटण : प्रतिनिधी 

माझ्या जीविताला धोका असल्याचे ना. श्रीमंत रामराजे यांनी काल, रविवारी (दि. 2) येथील एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज, सोमवारी थेट फलटणला येऊन रामराजे तर गुरू आहेत. मी कशाला त्यांना धमकावेन. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी साने गुरुजींचे पाढे वाचावेत, असा सल्ला दिला. 

खा. उदयनराजे भोसले सोमवारी शिंगणापूर (ता. माण) येथून श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन पुण्याकडे जात फलटण येथे थांबून निवडक पत्रकारांजवळ ही प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबतचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.  तेे म्हणाले, जशास तसे, उत्तर देण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. तशी माझी नाही. मी दुर्लक्ष करतो. ते फार मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडून भरपूर शिकण्यासारखे आहे. मी कशाला त्यांना धमकी देऊ? ते तर माझ्यासाठी गुरूच्या ठिकाणी आहेत. गुरूंनी विचार केला पाहिजे. संपूर्ण जीवनात सगळ्यांबरोबर कसे वागावे. साने गुरुजींचे थोडे पाढे त्यांनी वाचले पाहिजेत. खासदारकी, आमदारकी हा विषय नाही. पण, एक व्यक्ती म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो. 

कोण बोलतोय, काय बोलतोय? हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. माझा कोण शत्रू नाही. कोण मित्रही नाही. आता तेच मला स्वयंघोषित शत्रू मानत असतील तर तो त्यांचा प्रश्‍न आहे, माझा नाही, असेही खा. उदयनराजे म्हणाले. 

दरम्यान, खा. उदयनराजे भोसले हे श्रीमंत रघुनाथराजेंच्या ‘जय-व्हिला’ या निवासस्थानी गेले. निवासस्थानात आत न जाता बाहेर श्रीमंत रघुनाथराजेंच्या अलिशान गाड्यांची  त्यांनी पाहणी केली. दरम्यान, श्रीमंत विश्‍वजीतराजे हे तेथे पोहोचले व आत चला, असा आग्रह केला. त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे यांनीही सौजन्याने घरात या, असे म्हणत स्वागत केले. मात्र, खा. उदयनराजे यांनी निवासस्थानाच्या बाहेरच राहणे पसंत केले.