Sun, May 26, 2019 01:05होमपेज › Satara › कॉलर खेचायची की विजार ओढायची हे जनता ठरवेल

कॉलर खेचायची की विजार ओढायची हे जनता ठरवेल

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 11:31PMसातारा : प्रतिनिधी

कुणाची कॉलर वर जाणार कुणाची खाली जाणार, कुणाचा शर्ट काढायचा, कॉलर खेचायची की विजार ओढायची हे जनता ठरवेल. उदयनराजेंनी बोलतो त्याप्रमाणे करून दाखवावे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी सातार्‍यात पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजेंवर टिकास्त्र सोडले. दरम्यान, सातार्‍याच्या खासदारांचे  लोकसभेतले काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषदेत रामराजेंनी उदयनराजेंवर मोजके विधान केले होते. त्यानंतर काही पत्रकारांनी विश्रामगृहावर जाऊन उदयनराजेंबाबत रामराजेंना खोदून खोदून बोलायला लावले. प्रश्‍नांची उत्तरे देताना रामराजे म्हणाले, कर्नाटक राज्यातील निवडणूक निकालानंतर पुढील राजकीय निर्णय शरद पवारसाहेब घेतील. आम्ही जिल्ह्यात नसलो की, अनेकांच्या कॉलर वर होतात. सातार्‍यातून कोणाला उमेदवारी दिली जाणार, हे  शरद पवार निर्णय  घेतील. आम्ही दुसरे कोणाला नाही केवळ पवारसाहेबांशी बांधील आहोत. 

खा. उदयनराजे त्यांच्या उमेदवारीसाठी दिल्‍लीला गेले होते का, असे विचारले असता त्यात एवढं काय? जसे ते दिल्‍लीला जाऊन खा. पवार यांच्याशी चर्चा करतात, तसे आम्हालाही दिल्‍लीला जाता येते. आम्ही सातार्‍यात नसताना अनेक जण कॉलर उडवत असतात, असेही ते म्हणाले. सातार्‍याच्या जागेबाबत खा. शरद पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केलेली नाही. कोण म्हणत असेल आम्हाला उमेदवारी दिली आहे. त्याबाबत खा. पवार यांच्यासोबत सर्व आमदार बोलतील. वेळ आल्यानंतर योग्य ते उत्तर देऊ, असेही ना. रामराजे यांनी स्पष्ट केले. 

रामराजे म्हणाले, निवडणुकीपूर्वी अशा चर्चा होतात त्यांना माझ्यादृष्टीने महत्त्व नाही. या चर्चा अपरिपक्‍व आहेत. 10 वर्षे दिल्‍लीत राहून काम करण्याची चांगली संधी उदयनराजेंनी सोडली याची खंत वाटते. त्यांचे काम गिनीज बुकात नोंद करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.