Fri, Feb 22, 2019 12:33होमपेज › Satara › सातारा : रामराजे-शिवेंद्रराजेंनी कापला तलवारीने केक

सातारा : रामराजे-शिवेंद्रराजेंनी कापला तलवारीने केक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जावलीच्या कार्यक्रमात ‘आता मनोमीलन कायमचे तडीपार केले आहे. पुन्हा तडजोड नाही. मला अडवण्याची कुणात धमक नाही,’ असे जाहीर विधान करून आक्रमक बाणा दाखवणार्‍या आ. शिवेंद्रराजेंनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला जिल्हा बॅँकेच्या सभागृहात विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा हात हातात घेवून तलवारीने केक कापला. दोघांनीही दोन वेगवेगळ्या तलवारी उंचावल्या. आ. शिवेंद्रराजेंची ही देहबोली नव्या राजकीय रणनीतीचे संकेत देऊन गेली.

त्याचे असे घडले की, जावलीच्या कार्यक्रमात आ. शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे संकेत दिले. आता तडजोड नाही, असे सांगत आ. शिवेंद्रराजेंनी भविष्यातील वाटचाल अधिक आक्रमक असल्याचे सूचित केले. इकडे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह आ. शिवेंद्रराजे भोसले या मेळाव्यास उपस्थित होते.

मेळाव्यातील मान्यवरांच्या भाषणानंतर विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचा केक मांडण्यात आला. या केकवर दोघांचीही नावे होती. कार्यकर्त्यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हातात तलवार दिली.  तर रामराजेंच्या हातातही दुसरी तलवार देण्यात आली. दोघांनीही तलवारीला हात लावून वाढदिवसाचा केक कापला व पुन्हा आपापल्या तलवारी उंचावल्या. दोघांनीही

एकमेकांना केक भरवला. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात अलिकडच्या काळात ना. रामराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्यातील राजकीय भूमिका एकमेकांना पूरक आहेत. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाच्या  निमित्‍ताने या भूमिकेला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे. रामराजेंच्या साथीने शिवेंद्रराजेंनी पुढच्या राजकीय रणनीतीची चुणूकच दाखवली. 

कार्यक्रमास जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जि.प. सदस्य प्रदीप विधाते, संचालक कांचन साळुंखे,  राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ, प्रकाश बडेकर, राजेंद्र राजपुरे प्रमुख उपस्थित होते.

Tags : satara, satara news, Ramraje, Shivendra Raje,  cut, cake, sword,


  •