Sat, Feb 23, 2019 10:12होमपेज › Satara › अण्णा चांगले, सोबतचे अयोग्य

अण्णा चांगले, सोबतचे अयोग्य

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 10:53PMकराड : प्रतिनिधी

अण्णा हजारे हे चांगले व्यक्ती आहेत, असे आपले मत आहे. मात्र त्यांच्याभोवती जमा होणारे लोक अयोग्य असतात. मागील आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांच्यासह काहीजण नेते झाले. आपण देशहितासाठी आंदोलन करतो, कोणी नेता व्हावे म्हणून कधीच आंदोलन करत नाही, असे स्पष्ट करत रामदेव बाबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिकाच केली आहे.

कराडमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने आयोजित तीन दिवसीय योग व ध्यान शिबिरास शनिवारी प्रारंभ झाला. या शिबिराचे पहिले सत्र संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामदेव बाबा यांनी ही टीका केली.रामदेव बाबा यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना अण्णा हजारे हे चांगले व्यक्ती असल्याचे सांगितले. देश हितासाठी आपण आठ वर्षापूर्वी त्यांना उत्तर भारतात नेले. तेथे त्यांची ओळख निर्माण करण्यात आपलेही मोठे योगदान होते. त्यानंतर हजारो, लाखो लोक एकत्र आले आणि पाच वर्षापूर्वी ऐतिहासिक आंदोलन झाले होते. मात्र या आंदोलनानंतर अण्णा हजारे यांच्या भोवती असणारे अरविंद केजरीवाल यांच्यासारखे लोक राजकारणात उतरले.

मात्र अण्णांच्या आंदोलनाचा वापर करून कोणी राजकारणी बनेत असेल तर आंदोलनाला पाठिंबा द्यायचा का? हा खरा प्रश्‍न होता. कोणी नेता व्हावे, म्हणून आपण आंदोलन केले नाही. त्यामुळेच यावर्षी आपण अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनास आपण पाठिंबाही दिला नसल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे. सोबतच्या लोकांचे अवलोकन करा, असेही आपण अण्णांना सांगितल्याचे रामदेव बाबा यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags : Satatra, Ramdev Baba, indirectly, resisting, Delhi, Chief Minister, Arvind Kejriwal.