Sat, Jun 06, 2020 00:49होमपेज › Satara › 'त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझं यू-ट्यूबही रडलं' (video)

'त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझं यू-ट्यूबही रडलं' (video)

Published On: Oct 02 2019 4:38PM | Last Updated: Oct 02 2019 6:42PM
सातारा : प्रतिनिधी 

'पक्ष सोडून जाणार्‍याच्या डोळ्यांत पाणी बघून माझं यूट्युब चॅनेलही रडलं. त्यांच्या अभिनयाबद्दल त्यांना महाऑस्कर द्यायला हवा. १६ संसार सांभाळणाऱ्यांना मला शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही. दूध डेअरी विकणाऱ्यांनी आणि ज्यांना पाण्यातलं काही कळंत नाही, त्यांनी मी मंत्रिपदासाठी पाणी विकले असले आरोप करू नये, अशी बोचरी टीका रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे व खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर केली.

फलटण येथे राजे गटाच्या वतीने आयोजित युवा संवाद मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना रामराजे बोलत होते. 'आज रडीचे राजकारण सुरू आहे व विकासाचे राजकारण मागे पडत आहे. कंपनी ही नोकरीसाठी आणायची असते. दूध डेअरी ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्यासाठी काढायची असते. माणचे आमदार म्हणतात की काय केले? दूध डेअरी काढली ती कशी काढली हे सर्वांना माहिती आहे, मागील ५ वर्षे ज्यांनी टीका केली ते भाजपमध्ये गेलेत. त्यांनी ८० कोटी रुपयांचे कर्ज कार्यकर्त्यांच्या नावावर घेतले आहे. सभापतीपद हे कम्पाऊंडच्या आत आहे. मला पद मिळण्यासाठी ही निवडणूक लढवायची नाही. परंतु चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकविण्यासाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपणास जिंकायची आहे. जिल्हा व तालुका सुखरूप ठेवायचा असेल तर आपल्याला चूक करून चालणार नाही, विकृत माणसं एकत्र येतात तेव्हा आपल्याला एकत्र राहावे लागणार आहे. आमचं राजकारण त्यागाचं राजकारण आहे.

गेली ३० वर्षे अविरत कष्ट केले आहे. काही जणांना रामराजेंना शिव्या घातल्याशिवाय झोप लागत नाही. हा जिल्हा सुखरूप ठेवायचा असेल तर आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यांना पाण्यातलं काही कळत नाही. ह्यांच्या हातात हा जिल्हा दिला तर त्यांना ११ तालुके संपवायला एक वर्षही लागणार नाही, अशी भीतीही रामराजे यांनी व्यक्त केली. दीपक चव्हाण यांना मागील दोन वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.