Thu, Apr 25, 2019 04:10होमपेज › Satara › महिला राष्ट्रवादीतर्फे मंत्र्यांना घेराव

महिला राष्ट्रवादीतर्फे मंत्र्यांना घेराव

Published On: Sep 06 2018 1:57AM | Last Updated: Sep 05 2018 11:07PMसातारा : प्रतिनिधी

घाटकोपर येथे दहीहंडी उत्सवात भाजपच्या आ. राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या व्यक्‍तव्याचे  सातार्‍यात पडसाद उमटले. बुधवारी शिक्षकदिनानिमित्त सातार्‍यात आलेल्या शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे घेराव घालत ‘मुली काय शोभेच्या वस्तू आहेत का? त्यांना कोणीही यावे आणि पळवून न्यावे, नावात राम आहे; पण त्याची वृत्ती रावणाची आहे, असे बेताल वक्‍तव्य करणार्‍या आमदारावर कारवाई करून त्याची हकालपट्टी करा,’ अशी जोरदार मागणी करण्यात आली. 

भाजप आ. राम कदम यांनी घाटकोपर येथे आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमावेळी तरुणांचा उत्साह वाढवण्याच्या नादात तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याचा अनेक संघटनांकडून निषेध करण्यात आला. त्यातच बुधवारी शिक्षकदिनानिमित्त सातार्‍यात राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्यास शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आले होते. जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी शिक्षक संघटनांना शासकीय विश्रामगृहात बोलवले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सातारा महिला आघाडीच्या महिलांसह विनोद तावडे यांना घेराव घालत तुमच्या पक्षाचा आमदार राम कदम हा दहीहंडीच्या नावावर फेमस झाला आहे. यात तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी बेभानपणे मुक्‍ताफळे उधळली आहेत. त्याच्यावर भाजपा पक्षाचे जबाबदार नेते आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून तुम्ही काय कारवाई करणार आहे, अशी विचारणा केली. यावर तावडे यांनी हा विषय माझ्याकडे नाही तो गृहमंत्र्यांच्याकडे आहे. मी तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवतो असे सांगत कदम यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी  कारवाई करतील, असे  आश्‍वासन दिले. 

शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची गाडी आल्यानंतर त्यांनाही घेराव घालण्यात आला.  राम कदम यांच्या वक्‍तव्याबाबत तुमची काय भूमिका आहे? असे विचारत तुम्ही फक्‍त आरक्षणासाठीच पुढाकार घेता का? मुली म्हणजे काय शोभेच्या वस्तू आहेत का? कोणीही यावे आणि त्यांना पळवून न्यावे, असा भडिमारच महिलांनी केला.  त्यावर जानकर यांनी सर्व मुली या सावित्रीच्या लेकी आहेत. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असे सांगितले. यावर चित्रा वाघ यांनी अशी भाषा करणार्‍या राम कदम यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आमच्या महिलासमोर येऊन बोलावे, अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणार्‍याचा निषेध करत आहोत. त्यांना महाराष्ट्रातून बाहेर हाकलून दिले पाहिजे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असून शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालतोय. अशावेळी कोणीतरी महिलांविषयी अपशब्द वापरतो हे  अशोभनीय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप एकही शब्द बोलले नाहीत. तर राम कदम यांनी अद्यापही माफी मागितली नाही. असे म्हणत सरकारच्या पाठराखण करण्याच्या भूमिकेचा यावेळी  निषेध करण्यात आला.