Sat, May 25, 2019 23:07होमपेज › Satara › उपनगराध्यक्षपदी राजेशिर्के बिनविरोध

उपनगराध्यक्षपदी राजेशिर्के बिनविरोध

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:16PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुहास राजेशिर्के यांचे शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत राजेशिर्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करत असल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी जाहीर केले. या निवडीनंतर सातारा विकास आघाडीतील नगरसेवकांनी जल्लोष केला. दरम्यान, या निवडीनंतर इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक निवडीचे वेध लागले आहेत.

मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनात साविआ नगरसेवकांसोबत येऊन सुहास राजेशिर्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल  केला. त्यानंतर दुपारी 12.20 वाजता  नगरपालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात पीठासीन अधिकारी  तथा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली.  

सभेपूर्वी सौ. माधवी कदम यांनी संबंधित उमेदवारी अर्जाची छाननी केली. या निवडणुकीत सुहास राजेशिर्के यांचाच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. सौ. माधवी कदम, मावळते उपनगराध्यक्ष राजू भोसले, साविआच्या सभागृह नेत्या स्मिता घोडके, प्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बांधकाम सभापती मनोज शेंडे व पदाधिकार्‍यांनी सुहास राजेशिर्के यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, या निवडीनंतर सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. कार्यकर्त्यांनी राजेशिर्के यांची शहरातून मिरवणूक काढली.  दरम्यान, सभापती निवडी, उपनगराध्यक्ष निवड या प्रक्रियेनंतर सत्तापरिघाबाहेर असणार्‍या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक निवडणुकीचे वेध लागले आहेत.