Tue, Nov 13, 2018 21:24होमपेज › Satara › केंद्रात व राज्यात थापाड्यांचे सरकार : राज ठाकरे

केंद्रात व राज्यात थापाड्यांचे सरकार : राज ठाकरे

Published On: Feb 02 2018 1:35AM | Last Updated: Feb 01 2018 10:34PMसातारा : प्रतिनिधी

राजकारण्यांच्या भूलथापांना बळी पडून पाच वर्षे घालवायला तुम्ही अमरत्व घेऊन आलाय का? याची थाप चांगली की त्याची थाप चांगली हा विचार करुन किती वर्षे त्यांना असे मतदान करणार? राज्यात आणि केंद्रात थापाड्यांचे सरकार आहे, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत केला. 

जिल्हा    परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. कार्यक्रमास मनसे नेते अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, अनिल शिवणकर, राजू पाटील, अभिजीत पानसे, सरचिटणीस रिटा गुप्‍ता, मनोज चव्हाण, राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर, अमेय खोपकर, हाजीसैफ शेख, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, स्वाती शिंदे, धैर्यशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, राज्यात आणि देशात थापाड्यांचे सरकार आहे. सत्‍ता मिळेपर्यंत ते तुमच्याशी खोटे बोलतात. गुजरातचे पंतप्रधान मोदी स्वित्झर्लंडला गेल्याचे कळले. त्यावर अनेकांच्या नजरा बँक खात्याकडे लागल्या.  मात्र, 15 लाख रुपये कुणाच्याही खात्यावर जमा झाले नाहीत. 

भाजप सरकार किती दिवस लोकांना आश्‍वासनांवर झुलवत ठेवणार आहे?  मोदींच्या आश्‍वासनाप्रमाणे कुणाच्याच खात्यावर 15 लाख आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुसते सत्‍ता.. दुरी.. असे आकडे जाहीर करतात. फडणवीस मटकाकिंग रतन खत्रीकडे कामाला होते का? हजारो कोटींचे प्रकल्प जाहीर करणार्‍या नितीन गडकरींचा खिसाही फाटकाच असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

धर्मा पाटील नावाचा शेतकरी मंत्रालयात विष प्राशन  करुन तडफडत असताना विदेशात गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अंगावर बर्फ घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. साडेतीन वर्षांत सरकारच्या कारभारामुळे राज्यात काहीही बदल झालेला नाही. दररोज काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही ते म्हणाले. 

संदीप मोझर म्हणाले, रयत-कुमुदा, मायक्रो फायनान्स तसेच जिजामाता सहकारी बँकेविरोधात उभारलेल्या लढ्याला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्षाचे जोमाने काम सुरु आहे. अन्याय दिसेल तिथे लाथ मार, या त्यांनी दिलेल्या आदेशानुसारच काम करत आहे.