होमपेज › Satara › गावागावात योग चळवळ उभी करा

गावागावात योग चळवळ उभी करा

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 9:18PMकराड : प्रतिनिधी 

डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानकडून कराडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय योग शिबिराची सोमवारी सकाळी अभूतपूर्व उत्साहात सांगता झाली. कराडचे शिबिर सदैव आठवणीत राहणार असून मी पुन्हा कराडला येईल, असे अभिवचनही योगगुरू रामदेव बाबा यांनी दिले आहे. यावेळी योग चळवळ गावात रूजावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मतही रामदेव बाबा यांनी यावेळी व्यक्त केले.

14 एप्रिलपासून पहाटे पाच ते सकाळी साडेसात या वेळेत तीन दिवसीय योग शिबिरास प्रारंभ झाला होता. सोमवारी या शिबिराचा अखेरचा दिवस होता. पहाटे पावणे पाच वाजता सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अखेरच्या सत्राचे उद्घाटन झाले. त्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनी मनोगत व्यक्त करत यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली. 

त्यानंतर सव्वा पाचच्या सुमारास जवळपास अडीच तास स्वामी रामदेव बाबा यांनी योग महत्त्व व आपले आरोग्य याबाबत मार्गदर्शन करत योग प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे सामाजिक ऐक्य, देशहितासह स्वदेशी वस्तूचा वापर करत विदेशी वस्तूवरील बहिष्काराचेही महत्त्व पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सकाळी साडेसातच्या सुमारास अखेरच्या दिवसाच्या सत्रांची सांगता झाली. 

यावेळी रामदेव बाबा यांनी कराडचे योग शिबिर नेहमीच आपल्या स्मरणात राहिल. सोलापूरला जेव्हा अतुल भोसले भेटले, तेव्हा त्यांना आपण किती दिवसात तयारी पूर्ण कराल, असे विचारले होते.

अनेकांना महिनामहिना तयारीसाठी पुरत नाही. मात्र अतुल भोसले यांनी दिलेले शब्द पाळत योग शिबिराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याचे सांगितले. डॉ. अतुल भोसले यांच्यातील सामाजिक कार्याची भावना पाहून आपण थक्क झालो आहोत. हे संस्कार रूजवण्यात डॉ. सुरेश भोसले यांच्यासह स्व. जयवंतराव भोसले यांचे मोठे योगदान असल्याचेही गौरवोद‍्गार रामदेव बाबा यांनी यावेळी काढले.

त्यानंतर अतुल भोसले यांनी शिबिराबाबत आपले मनोगत व्यक्त करताना योग चळवळीचा एक भाग होण्याची संधी आम्हाला मिळाली. या शिबिरामुळे सर्वसामान्य कराडकरांना निश्‍चितपणे फायदा होणार आहे. त्यामुळेच यापुढे गावागावात योग चळवळ उभी राहून युवा पिढी अधिक सशक्त व्हावी आणि त्याचा गाव, तालुका, राज्य आणि देश सशक्त, महासत्ता होण्यासाठी हातभार लागावा, म्हणून प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.

Tags : Raise, yoga movement village, satara news