Sat, Nov 17, 2018 01:32



होमपेज › Satara › आला पावसाळा; घाट रस्ता सांभाळा 

आला पावसाळा; घाट रस्ता सांभाळा 

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 11 2018 10:13PM



खेड : अजय कदम

पावसाळ्यात जिल्ह्यातील दुर्गम भागात घाटातील दरडी कोसळून अपघात होतात. त्याचप्रमाणे रस्ता बंद होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने धोकादायक घाट रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून आताच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुरेसा निधी उपलब्ध करून पावले उचलणे गरजेचे आहे. 

जिल्ह्याचा पश्‍चिम भाग पूर्ण डोंगराळ आहे. कोयनेपासून महाबळेश्‍वरपर्यंत तसेच ढेबेवाडी वाल्मिकी पठार अशा दुर्गम भागात सर्वत्र घाट रस्ते आहेत. यामधील कोयना-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट, महाबळेश्‍वर येथील अंबेनळी घाट, वाई-महाबळेश्‍वर मार्गावरील पसरणी घाट, केळघर घाट या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. पर्यटनाबरोबर प्रवासी व माल वाहतुकीसाठी अवघड रस्ते असले तरी या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. मात्र, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प होवून वाहनांचे अपघातही होतात. पावसाळ्यात या घाटात मोठी वाहतूक असते. अंबेनळी घाटात तर चिपळूण रत्नागिरीकडील उद्योगांसाठी अवजड मालाची वाहतूक होते. या सर्व घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. दरवर्षी दरडी कोसळण्याच्या व रस्ता खचण्याचे प्रकार घडतात.

सातार्‍यानजीकच्या बोरणे घाटात व वाई जवळील पसरणी घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठे आहे. सुदैवाने दरडी कोसळल्याने जीवित हानी होत नसली तरी वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणावर होतो. या घाट रस्त्यावरुन पावसाळ्यात पर्यटनासाठी जाणार्‍यांची संख्या अधिक असते. ठोसेघर धबधबा, महाबळेश्‍वर, पाचगणी तसेच प्रतापगड परिसरात जाण्यासाठीही पर्यटकांची गर्दी असते. अशावेळी दरडी कोसळून घाट बंद झाल्यास पर्यटकांची अडचण होते. दरड कोसळून वाहतूक कोंडी झाल्यास त्या भागाचा संबधित शहरांशी संपर्क तुटतो. यावर उपाय म्हणून घाट रस्त्यांची डागडुजी व दुरूस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध केला जातो. परंतु, या आवश्यक कामाचा निधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने डागडुजी व दुरुस्तीसाठी मर्यादा येतात. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्यास सर्वांचीच पळापळ होते. 

निधीची कमतरता असली तरी जिल्हा प्रशासनाने अन्य मार्गाने निधी उभा करुन पावळ्यापूर्वी या घाट रस्त्यावरील दरडी कोसळणार्‍या भागाची डागडुजी करणे आवश्यक आहे. तसेच दरड कोसळल्यास ती तातडीने हटवण्यासाठी  यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

कायमस्वरूपी उपाययोजना कधी?

जिल्ह्यातील प्रमुख घाट रस्त्यांची तात्पुरती डागडुजी पावसाळ्यापूर्वी केली जाते. पण ही तात्पुरती मलमपट्टी उपयोगाची नाही. दरडी कोसळण्याचे प्रकार घडणार्‍या घाटात पर्यायी रस्ते निर्माण करणे, धोकादायक दरडी व दगड हटवणे, लोखंडी जाळी बसवणे, घाटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांची स्वच्छता व संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाकडून ठोस निधी उपलब्ध झाल्यास घाटातील सुरक्षितता धोक्यात येणार नाही.