Thu, Jun 20, 2019 20:58होमपेज › Satara › पश्‍चिमेकडे संततधार कायम

पश्‍चिमेकडे संततधार कायम

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:36PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यात सोमवारी दिवसभर पावसाची भुरभुर सुरूच राहिली. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. पावसामुळे पश्‍चिम भागात भात लावणीच्या कामाला वेग आला असून पेरणी केलेल्या पिकांना पोषक हवामान निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात मात्र अजूनही पावसाची समाधानकारक हजेरी नसल्याने शेतकर्‍यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. सोमवारी महाबळेश्‍वर, वाई, जावली, सातारा, पाटण या तालुक्यांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर तुलनेने कमी जाणवला मात्र, भुरभुर कायम राहिली. 

कराड, खंडाळा, कोरेगाव, फलटण तालुक्यात पाऊस कमीच होता. माण, खटाव तालुके तर कोरडेच राहिल्यासारखी स्थिती होती. पश्‍चिमेकडे सकाळपासूनच पावसाची भूरभूर सुरू होती. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात  सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 7.9 मि.मी., जावली 14.1 मि.मी., पाटण 28 .8 मि.मी., कराड 8.8 मि.मी., कोरेगाव 3.1 मि.मी., खटाव 2.6 मि.मी., माण 0.9 मि.मी., खंडाळा 0.4 मि.मी., वाई 5.7 मि.मी., महाबळेश्‍वर 80. 5 मि.मी.अशी 152.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.