Thu, Apr 25, 2019 06:16होमपेज › Satara › पुन्हा धुवाँधार; धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ 

पुन्हा धुवाँधार; धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ 

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:30AMसातारा : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून कधी उघडीप देणार्‍या, तर कधी भुरभुरणार्‍या पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असून पश्‍चिमेकडे सोमवारी सरींवर सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत गारठा निर्माण होऊन जनजीवनही विस्कळीत झाले. दरम्यान, सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सातारा शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहर व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारठा निर्माण झाला होता. अधूनमधून पडणार्‍या  पावसाच्या मुसळधार सरींमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे ओढे, नाले, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाळी पर्यटनांसाठी सोमवारी सातारा शहर व परिसरातील नागरिकांनी कास, ठोसेघर, बामणोली, यवतेश्‍वर, कोयनानगर, पाचगणी, महाबळेश्‍वर येथे गर्दी केली होती.

सोमवारी सकाळी 8  वाजेपर्यंत जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 18.56 मि.मी., जावली 18.53 मि.मी., पाटण 19.27 मि.मी., कराड 6 मि.मी., कोरेगाव 8.33 मि.मी., खटाव 12.88 मि.मी., खंडाळा 1.70 मि.मी., माण 2.29मि.मी.,फलटण 0.33मि.मी., वाई 3.71 मि.मी., महाबळेश्‍वर 100.78 मि.मी. अशी  जिल्ह्यात एकूण 192.88 मि.मी. पावसाची नोंद झाली.

दरम्यान, खरीप हंगामातील पिकांना पाऊस  चांगला असून अनेक ठिकाणी अडसाली उसाच्या लागणी सुरू आहेत. त्यामुळे      ऊस पिकांची उगवणक्षमताही चांगली राहणार असल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले.

‘कोयना’तून आज पाणी सोडणार

पाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. धरणात एकूण पाणीसाठा 99.52 टीएमसी झाल्याने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यानंतर धरणाचे सहा वक्री दरवाजे वर उचलून त्यातून सुमारे बारा हजार क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. 

धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी अगोदरच सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याने नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. दरम्यान धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 21524 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणाला आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 5.48 टीएमसी पाण्याची गरज आहे. 

सध्या धरणात एकूण पाणीसाठा 99.52 टीएमसी, पैकी उपयुक्त साठा 94.52 टीएमसी,  पाणीउंची 2159.1 फूट, जलपातळी 658.089 मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण 4098 मि.मी., नवजा 4165 मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 3645 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.