Fri, Apr 26, 2019 17:48होमपेज › Satara › रेल्वे प्रशासनाच्या नोटिसांनी बेघर सैरभैर

रेल्वे प्रशासनाच्या नोटिसांनी बेघर सैरभैर

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:18PMलोणंद : शशिकांत जाधव

लोणंद रेल्वे स्थानकाजवळ अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणार्‍या बेघरातील लोकांना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटीसीने या लोकांची झोप उडाली असून ते सैरभैर झाले आहेत. आमचे घर तोडू नका, असा टाहो ते रेल्वे प्रशासनासमोर फोडत आहेत. 

लोणंद शहराच्या पूर्वेला असलेल्या रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून 200 हून अधिक  कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, वडार वस्ती, डोंबार वस्ती, घिसाडी समाज वस्तीमध्ये हातावर पोट असणारी व दारोदार फिरून आपला उदर निर्वाह करणारे लोक येथे जीवन जगत आहेत. त्यांनी या ठिकाणी कपड्याचे पाल, पत्र्याचे शेड, कच्चे बांधकाम करून आपली घरे बांधली आहेत. त्यामुळे त्यांचे हे घरच आधार आहे. लोणंद ग्रामपंचायतीने अनेक कुटुंबांची नोंद सदर जागेवर भोगवटादार म्हणून आपल्या दप्तरी केली आहे. त्यांना लाईट, पाणी, शौचालय आदी सुविधा दिल्या आहेत. आता सरकारी जागेत राहणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी व परिसरातील लोकांना मध्य रेल्वे प्रशासनाकडून जागा खाली करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे या जागेवर वर्षानुवर्षे राहणार्‍या गरीब व दारिद्रय रेषेखालील लोकांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे. 

रेल्वे प्रशासनाच्या नोटीसांमुळे या नागरिकांच्या निवार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लोणंदच्या खरात समाजाने लोणंदला रेल्वे होण्यासाठी आपल्या जागा दिल्या होत्या. त्यावर रेल्वे स्टेशन, फलाट फार्म, रेल्वे धक्का, रेल्वे वसाहत आदी झाले आहे, परंतु बरीचशी मोकळी जागा रेल्वे स्टेशनच्या दक्षीण व उत्तर बाजूस राहिली आहे. उत्तर बाजूस राहिलेल्या मोकळ्या जागेतील काही जागा रेल्वे रोटरी गार्डन वापरासाठी दिलेली आहे. त्याच्या पलीकडील जुना फलटण रोडपयर्ंतच्या रिकाम्या जागेत बेघर  कुटुंबांनी छप्पर वजा घरे बांधली आहेत. या ठिकाणी रेल्वेच्या पावर हाऊसची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी जागा खाली करायच्या या नोटीसा आहेत.आमची घरे पाडु नका त्याऐवजी उर्वरीत जागेवर रेल्वेने पावर हाऊसची उभारणी करावी, आम्ही रहात असलेली जागा रेल्वेची नसून नगरपंचायत मालकीची आहे. आम्हाला उदध्वस्त करू नका, अशी मागणी या लोकांनी केली आहे.

रेल्वेने दिलेल्या नोटीसांमुळे गरीबांचा निवारा जाणार आहे. त्याचा सहानभुतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके - पाटील व नगरसेविका हेमलता कर्नवर यांनी केली आहे.