होमपेज › Satara › शालांत परीक्षेलाही ९ वीतील अभ्यासक्रमावर प्रश्‍न

शालांत परीक्षेलाही ९ वीतील अभ्यासक्रमावर प्रश्‍न

Published On: Apr 27 2018 1:10AM | Last Updated: Apr 26 2018 8:40PMसातारा : प्रतिनिधी

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात बरेच बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांना आता केवळ घोकंपट्टी न करता कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे.  दहावीचा नवीन अभ्यासक्रम हा नववीच्या अभ्यासक्रमाचे विस्तारित रुप असून गणित विषयात तर नववीच्या अभ्यासक्रमावर 20 गुणांचे प्रश्‍न असणार आहेत. 

मराठी, हिंदी व इंग्लिश या विषयांमध्येही व्याकरणावर आधारित 12 ते 14 गुणांचे प्रश्‍न हे पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमावर आधारीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कृतीशील व उपाययोजना आधारीत अध्ययन करावे लागणार आहे.

राष्ट्रीय करिक्युलम फोरम व राज्य करिक्युलम फोरम यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीचा नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे.दहावीच्या अभ्यासक्रमात समानता आणण्याच्या उद्देशाने हा नवीन अभ्यासक्रम विकसीत केला आहे. 

विद्यार्थी पुढील वर्गात गेला की मागील वर्षातील अभ्यासक्रम तो विसरून जातो. परंतु,  आता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात नववीच्या अभ्यासक्रमावर आधारीत काही प्रश्‍न असतील. गणित विषयामध्ये भाग एक व दोनमध्ये प्रत्येकी 8 असे एकूण 16 गुणांचे प्रश्‍न नववीचे असणार आहेत.प्रश्‍न क्रमांक 1 मधील अ व ब हा नववीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. त्यात त्रिकोणमितीचे सूत्र कोणते? रेशीय समीकरण? असे प्रश्‍न असतील. या सर्व प्रश्‍नांना प्रत्येकी एक गुण असेल तसेच प्रश्‍न क्रमांक तीनमध्ये अ‍ॅक्टिव्हिटी बेस प्रश्‍न असतील.  मराठी, हिंदी व इंग्रजी या  विषयांचे व्याकरण इयत्ता नववीतील असेल तर इतर विषयांचेही स्वरूपही विस्तारीत असेल.

ज्ञानरचनावादावरही अभ्यासक्रम

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती)च्या  वतीने इयत्ता दहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. ज्ञानरचनावाद या रचनेवर आधारलेला अभ्यासक्रम असून त्यात कृतीतून शिक्षणाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ घोकंपट्टी, पाठांतर न करता कृतीयुक्त अध्ययनावर भर दिला आहे.