होमपेज › Satara › हुतात्मा स्मारकांचे रुपडे पालटले

हुतात्मा स्मारकांचे रुपडे पालटले

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 11:32PMपुसेसावळी : विलास आपटे

खटाव तालुक्यातील हुतात्मा  स्मारकांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. याबाबत दै.‘पुढारी’ने हुतात्मा स्मारकांची अवस्था समाजासमोर आणल्यानंतर सध्या या सर्व स्मारकांचे नुतनीकरणीचे काम सुरु झाले आहे. आता आकर्षक रुपात ही स्मारके जनतेला पहावयास मिळणार आहेत. याबद्दल सर्वच नागरिकांतून दै. पुढारीचे अभिनंदन केले जात आहे.
खटाव तालुक्यात 6 ठिकाणी हुतात्मा स्मारके आहेत. स्मारकांच्या दुरवस्थेमुळे स्मारके ही गावातील रिकामटेकड्यांचा अड्डा व विश्रांतीस्थान बनले होते.

जयरामस्वामींचे वडगाव येथील स्मारकात मंत्री, पदाधिकारी, अधिकारी यांची ये-जा असते. त्यामुळे या स्मारकाची निगा राहिली होती. अन्य स्मारके म्हणजे जनावरांचा गोठा, जुगाराचा अड्डा व सार्वजनिक विश्रांतीगृहे बनली होती. सध्या या स्मारकांच्या नुतनीकरणाने संपूर्ण रुप पालटले आहे. परशुराम श्रीपती घार्गे, किसन बाळा भोसले, आनंदा श्रीपती गायकवाड, सिधू भिवा पवार, खाशाबा मारुती शिंदे, रामचंद्र कृष्णा सुतार (सर्व रा. जयरामस्वामींचे वडगाव), बलभीम हरी खटावकर, बाळकृष्ण दिगंबर खटावकर (रा. पुसेसावळी), श्रीरंगभाऊ शिंदे (उंचीठाणे) हे खटाव तालुक्यातील नऊजण हुतात्मे झाले.

स्वातंत्र्याच्या इतिहासात ही घटना अजरामर झाली. त्यामुळे हुतात्म्यांच्या रक्ताने पावन भूमी अशी खटाव तालुक्याची ओळख आहे. या हुतात्म्यांच्या त्यागाची ओळख व्हावी म्हणून खटाव तालुक्यात वडूज, वर्धनगड, कळंबी, पुसेसावळी, उंचीठाणे,  जयरामस्वामींचे वडगाव या ठिकाणी हुतात्मा स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र, विविध प्रकारच्या समाजविघातक गोष्टींमुळे स्मारकांचे पावित्र्य धोक्यात आले होते. 

स्मारकातील शौचालय व प्रसाधनगृहाची मोडतोड झाली होती. स्मारकांत मिळेल त्या जागी लघुशंका केल्याचे चित्र होते.  त्यामुळे स्मारकांतून दुर्गंधी पसरलेली होती तसेच अनेक गैरप्रकार सुरु होते. दगड गोटे, धुळ, पक्षांची विष्ठा यामुळे स्मारकांत दुर्गंधी होती. स्मारकांतील दरवाजांची मोडतोड, फरशींची तोडफोड, प्लायवूड चोरी व तोडफोड यामुळे स्मारकांचे अस्तित्व धोक्यात आले होते.

सन 2003 साली दै. पुढारीने स्मारकांच्या दुरवस्थेबाबत हुतात्मा स्मारके मृत्यूच्या  दाढेत अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावर लोकप्रतिनिधींकडून  स्मारकांची रंगरंगोटी करण्यात  आली होती. त्यानंतर तब्बल चौदा वर्षात स्मारकांच्या देखभाल दुरुस्तीकडे कोणाचेच लक्ष नव्हते. सध्या या स्मारकांचे रुप पालटले आहे. पूर्वी स्मारकांना लोखंडी ग्रील होते. आता भिंती बांधल्या आहेत. खिडक्या स्लायडींगच्या आहेत. दरवाजे व लॉक सुविधा  यामुळे अंतर्गत पावित्र्य जपले जाणार आहे.
 

 

tags : Puyesavalli,news,hutatma, Monument,Khatav ,Taluk, Renovation, work, started,