Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Satara › मांडवे शिवारातील बंधार्‍याचे काम निकृष्ट

मांडवे शिवारातील बंधार्‍याचे काम निकृष्ट

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 11:01PMपुसेसावळी :वार्ताहर 

येथील मांडवे शिवारातील ओढ्यावर सुरू असलेले सिमेंट बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे  असून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना लेखी व तोंडी सांगूनही कामाचा दर्जा निकृष्ठच आहे. या कामाची तपासणी करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बंधार्‍याचे काम नियोजित आराखड्याप्रमाणे होत नाही. बंधार्‍याच्या बांधकामासाठी वाळूचा वापर नगण्य आहे. वाळूऐवजी ग्रीड पावडरचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु आहे. शेवाळ मिश्रीत पाण्यातच काँक्रिट ओतले आहे. तेच पाणी बाहेर काढून माती मिश्रीत पाणी पुन्हा काँक्रिटसाठी वापरले आहे. खडी, वाळू व सिमेंट यांचे प्रमाण योग्य नाही.

निकृष्ट दर्जाचे काम करु नका, असे शेतकर्‍यांनी सांगितल्यावर काही काळ काम बंद ठेवून ठेकेदार पुन्हा तसेच काम सुरु ठेवतो. त्यामुळे शासनाच्या चांगल्या योजनेची वाट लावण्याचे काम सुरु आहे. निकृष्ट काम करायचे असेल तर बंधारा बांधूच नका, अशी येथील शेतकर्‍यांची भूमिका आहे. योग्य दर्जाचा बंधारा व्हावा , यासाठी शेतकर्‍यांनी उभ्या पिकातून नुकसान सोसून रस्ता दिला आहे. या बंधार्‍याच्या कामकाजाबाबत पाणलोट समितीच्या सचिवाने 15 फेब्रुवारीला तालुका कृषी अधिकारी यांना लेखी पत्र दिले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, हे काम चुकीच्या पद्धतीने होत आहे. काँक्रिटमध्ये वाळूचा वापर केला जात नाही.  त्यामुळे कामाचा दर्जा राहणार नाही. ग्रीडचा वापर सुरु आहे. चुकीच्या पद्धतीने काम केले तर याबाबतची बीले काढण्याची जबाबदारी पाणलोट समिती घेणार नाही. असे लेखी कळवूनही काम सुरुच आहे. या लेखी निवेदनावर सिधू मांडवे, राजाराम माने, आनंदा मांडवे, भिमराव मांडवे, राहूल जाधव,किरण पळसकर, शामराव मांडवे यांच्या स्वाक्षरी आहेत.