Thu, Apr 25, 2019 07:50होमपेज › Satara › कौशल्या वाघला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

कौशल्या वाघला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान

Published On: Mar 05 2018 1:45AM | Last Updated: Mar 04 2018 8:10PMपुसेसावळी : वार्ताहर 

रायगावची ‘सुकन्या’ कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राची ‘वाघीण’ कौशल्या वाघ हिला नुकतेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानीत करण्यात आलेे.  तसं पाहिलं तर कुस्ती हा मर्दानी खेळ. मुली हा खेळ खेळू शकत नाहीत, असा समाजाचा समज. मुलींनी कुस्ती खेळू नये, अशी परंपरा समाजात रूढ झालेली असताना या सर्व गोष्टी बाजूला ठेवून कुस्तीतही महिला अग्रेसर होत आहेत.
हरियानातील महावीरसिंग फोगट यांनी आपल्या नीता व बबीता दोन मुलींना लहानपणापासूनच कुस्तीचे धडे दिले. प्रसिद्ध अभिनेता अमिरखानने यावर चित्रपट तयार केला. या सिनेमातून आदर्श घेऊन आज ठिकठिकाणी महिला मल्ल आखाड्यात उतरत असल्याचे पहायला मिळत आहे.

कौशल्या ही खेड्यातील मुलगी. वडील कृष्णत वाघ यांनी मुंबईत हमाली करून मुलीच्या कुस्तीसाठी आपले सर्वस्व पणाला लावले.त्याचबरोबर भाऊ विकास यानेही कौशल्याची कुस्तीची आवड लक्षात घेऊन स्वतःच्या कुस्ती करियरला तिलांजली देत तिच्या पाठीशी कोच म्हणून उभे राहण्याची जबाबदारी पेलली. कौशल्या मैदानात उतरायची तेव्हा तिच्यासमोर कोणीही महिला मल्ल नसायची. अशावेळी पुरुष मल्लांशी दोन हात करत त्यांना चारीमुंड्या चीत करण्यात ती यशस्वी व्हायची.  48 किलो वजनी गटात पाच वेळा नॅशनल चॅम्पियनशिप तसेच 2006 मध्ये बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पहिले रौप्यपदक मिळवले तर तिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 12 पदके मिळवली आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे,पालकमंत्री विजय शिवतारे व मान्यवरांच्या उपस्थितीत तिला 2014-15 चा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.