Thu, Apr 25, 2019 21:36होमपेज › Satara › अनधिकृत बांधकामावर हातोडा टाका :शिवतारे

अनधिकृत बांधकामावर हातोडा टाका :शिवतारे

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 25 2018 1:01AMपाचगणी : वार्ताहर

महाबळेश्‍वर तालुक्यात निसर्गाला गालबोट लावून धनदांडग्यांकडून राजरोसपणे अनधिकृतपणे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे पर्यटनस्थळाला बाधा पोहोचत आहे. तसेच येथील निसर्ग सौंदर्य कालबाह्य होत आहे. त्यामुळे महाबळेश्‍वरमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाका, असा आदेश पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी दिला. 

महाबळेश्‍वर येथे आयोजित शेतकरी कर्जमाफी योजना व अनधिकृत बांधकामांविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार राजेश शेंडगे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, पोनि दत्तात्रय नाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, शहरप्रमुख विजय नायडू, बांधकाम अभियंता महेंद्र पाटील, विद्युत मंडळ अभियंता चांदणे उपस्थित होते. 
ना. शिवतारे म्हणाले, महाबळेश्‍वर नगरपालिका व उपविभागीय अधिकारी वाई यांनी संयुक्‍त कारवाई करून अनधिकृत बांधकामावर कायद्याची जरब बसवावी.

अनाधिकृत बांधकामे शोधून कोणाचाही मुलहिजा न ठेवता कारवाई करा. महाबळेश्‍वर पालिकेच्या हद्दीमध्ये वृक्षतोड व अनधिकृत बांधकामांचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर कारवाई करावी. शहरात जागोजागी लटकलेल्या तारा त्वरित काढून टाकाव्यात, आंबिका नामदेव सोसायटी  येथील उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या त्वरित दुरुस्त कराव्यात, छत्रपती शिवाजी चौक, सुभाष चौक, बाळासाहेब ठाकरे चौकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला असून लवकर कामे सुरू करावीत.