Sat, Apr 20, 2019 08:00होमपेज › Satara › श्रद्धास्थानाला धक्का पोहोचल्याने रहिमतपूरमध्ये अस्वस्थता

श्रद्धास्थानाला धक्का पोहोचल्याने रहिमतपूरमध्ये अस्वस्थता

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:13PMकोरेगाव : प्रकाश गायकवाड 

रहिमतपूरनगरीचे धार्मिक शक्तीस्थान असलेल्या गांधी चौकातील ऐतिहासिक मानाच्या हनुमान मंदिराला नगरपालिकेच्या आयलँडसाठी धक्का पोहचल्याने नागरिक व भाविकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मूळ सिंहासनाशिवाय प्रदक्षिणेसाठी चौफेर अडीच फूट तसेच दिवाबत्तीसाठी पुढे पाच फूट जागा सोडून उर्वरित मंदिर हटवण्याचा निर्णय त्यांना धक्कादायक वाटत आहे. पुरातन श्रद्धास्थानाची अशी अवस्था होत असेल तर आपले भविष्य काय? असाही प्रश्‍न सर्व सामान्य नागरिक व भाविकांना पडला आहे.

रहिमतपूर  नगरपालिकेने आपल्या नियोजित आराखड्यात गांधी चौकात आयलँड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या आयलँडसाठी जागा आरक्षित करण्यात आली असून काही व्यवसायिक व घरांनाही त्याचा फटका बसला आहे. जेसीबीच्या सहाय्याने संबंधित जागेतील इमारतींची पाडापाडीही करण्यात आली आहे. या आरक्षित जागेतच असलेल्या हनुमान मंदिरालाही त्यामुळे धक्का पोहचला आहे. मूळ सिंहासनाशिवाय प्रदक्षिणेसाठी चौफेर अडीच फूट तसेच दिवाबस्तीसाठी पुढे पाच फूट जागा सोडून उर्वरित मंदिर हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी कार्यवाहीही करण्यात आली आहे. मात्र त्यामुळे नागरिक व भाविकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. 

एकीकडे गडकिल्ले यांचे संवर्धन व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी सरकारने कोल्हापूरचे खा. संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जबाबदारी सोपवून पुरातत्व व ऐतिहासिक वारसा यांना धक्का न लागू देता उलट तो जतन केला जावा, अशी भूमिका घेतली असताना रहिमतपूरच्या हनुमान मंदिराबाबत मात्र वेगळाच न्याय दिसून येत असल्याची ग्रामस्थ व भाविकांची तक्रार आहे. 

रहिमतपूरवासियांचे श्रध्दास्थान असलेल्या उत्तराभिमुखी हनुमान मंदिरात गेल्या तीन पिढ्या चैत्र शुध्द पौर्णिमेला दहा दिवसांचा मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच या मंदिराची परंपरा ऐतिहासिक असून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त वर्षातील सर्वात मोठी यात्रा दक्षिणाभिमुखी मारुती तथा श्री रोकडेश्‍वराची यात्रा भरते. ऐतिहासिक वारसा जतन करणार्‍या या देवस्थानच्या वतीने पारंपरीक वेशातील भालदार, चोपदार व हजारो ग्रामस्थ  सजवलेला हत्ती घेवून दक्षिणाभिमुखी श्री रोकडेश्‍वर  देवाच्या सजवलेल्या पालखीतून  दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिराला भेट देवून भजनी मंडळाला निमंत्रण देण्यास जातात व तेथून पाटील यांना सन्मानाने निमंत्रण देत पालखी पुजनाला घेवून जातात.

ही परंपरा आजअखेर भाविक मोठ्या भक्तीभावाने जपत आहेत.असे असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी  ऐतिहासिक वारसा असणार्‍या मंदिराचा काही भाग आयलँडसाठी हटवण्यात आला आहे. याउलट  सत्ताधारी आघाडीने  सद्यस्थितीत प्रशासकीय बाबींचा बागुलबुवा न करता हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार करुन उत्सवाची परंपरा कायम राखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी  अपेक्षा भाविकभक्तांकडून व्यक्त होत आहे.

त्यावेळीही मंदिराचे पावित्र्य जपले होते...

सन 1980 साली तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही.पी. राजा, तत्कालिन मामलेदार व विश्‍वस्त बाळासाहेब फाटक यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नगरपालिकेला हनुमान  मंदिर उत्सवाचे सर्व साहित्य ठेवण्यासाठी लगतच स्वतंत्र जागेचा ठराव करावा लागला होता. एकीकडे या शासकीय अधिकार्‍यांनीही मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी त्यावेळी प्रयत्न केले असताना आता मात्र नगरपालिका व प्रशासन उलटी भूमिका घेत आहे. याबाबतची आठवण करून देताना जुन्याजाणत्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.