Tue, Apr 23, 2019 01:45होमपेज › Satara › सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी : वाहनांच्या रांगा 

महामार्गावर महाब्लॉक!

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 11:00PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

शनिवार, रविवार आणि नाताळच्या सुट्ट्या जोडून आल्याने नागरिकांची चंगळ झाली आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे शासकीय व निमशासकीय कर्मचारी, चाकरमानी व व्यापारी वर्ग पर्यटनासाठी बाहेर पडले आहे. त्यामुळे सकाळपासून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाला होता. 

सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आणि नाताळ सणानिमित्त विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेकांनी पर्यटनाचा मूड बनवला आहे. सर्वत्रच अशी परिस्थिती असल्याने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई व पुण्याकडे जाणार्‍या वाहनांची संख्या मोठी असल्याने सकाळपासूनच पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जाम झाला होता. तासवडे, आनेवाडी व खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे चित्र पहायला मिळाले. 

महामार्गावर वाहनांची ठिकठिकाणी मोठी कोंडी झाली होती. सलग मिळालेल्या सुट्ट्यांमुळे बहुतांश मुंबई आणि पुणेकरांनी जवळच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा बेत आखला. त्यामुळे अनेकांनी स्वत:च्या वाहनांनी प्रवास करण्यास प्राधान्य दिल्याने वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढली. सलग दोन दिवस या महामार्गावर ही कोंडी पहायला मिळत आहे. 

दरम्यान, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत असून परिस्थिती आटोक्यात ठेवून अपघात होणार नाहीत याचीही दक्षता वाहतूक पोलीस घेत होते.
मुंबईतील  व पुण्यातील तसेच कोल्हापूर येथील पर्यटक मौजमजा करण्यासाठी जवळचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या  महाबळेश्‍वर पाचगणी घाटमाथ्याजवळ इतर ठिकाणी    जाण्यास पसंती देत होते. पुणे-बंगलोर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या या पर्यटन स्थळाला पुण्यासह महाबळेश्‍वरच्या  पर्यटकांनीही पसंती दिली. त्यामुळे दोन्ही बाजूने येणार्‍या वाहनांच्या संख्येमुळे या परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडाला.

पुणे - बंगलोर महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. तर खंबाटकी घाटातही वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळे काही मिनिटात पार होणारा खंबाटकी  पार करण्यासाठी तास दोन तासाचा कालावधी लागत होता. सातारा-पुणे हा दोन तासाचा रस्ता होता. मात्र, वाहनांच्या कोंडीमुळे शनिवारी पुण्याला जाण्यासाठी पाच तासांचा वेळ लागला. 

याशिवाय, नववर्ष स्वागताला गोव्याकडे जाणार्‍या प्रवाशांची मोठी गर्दी मुंबई-पुणे-सातारा, ते कोल्हापूर मार्गे गोवा  या महामार्गावरही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आजचा दिवस  वाहतूक कोंडीचा ठरला. सातार्‍यात वाढे फाटा, लिंब फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट आणि शिवराज पेट्रोल पंप चौकात महामार्गाचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली. वाहतूक कोंडी वारंवार होत असल्याने ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले होते. 

दरम्यान, मुंबई आणि पुण्यातून मोठया प्रमाणात घराबाहेर पडलेले पर्यटक सुट्टी संपणार असल्याने पुणे बंगलोर  या महामार्गावर वाहने वाढली आहेत. त्यामुळे रविवारीही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.