Wed, Apr 24, 2019 11:34होमपेज › Satara › ‘पुढारी’चे कार्य ‘पॉझिटिव्ह’ ‘प्रॉडक्टिव्ह’

‘पुढारी’चे कार्य ‘पॉझिटिव्ह’ ‘प्रॉडक्टिव्ह’

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 11:27PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात दै. ‘पुढारी’ आयोजित ‘पुढारी एज्यु दिशा’ हे  आगळेवेगळे शैक्षणिक प्रदर्शन पाहून मी स्वत: प्रभावित झाले आहे. दहावी तसेच बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अनेक नामवंत शिक्षण संस्थांच्या सहभागामुळे ‘पुढारी एज्यु दिशा’ हे शैक्षणिक हब झाले आहे.  वृत्तपत्र क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या दै. ‘पुढारी’ची ही कृती ‘पॉझिटिव्ह’ आणि ‘प्रॉडक्टिव्ह’ आहे. त्याचा विद्यार्थ्यांना नक्‍कीच लाभ होईल, असे गौरवोद‍्गार सातारच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी काढले.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ पुणे, सहयोगी प्रायोजक विश्‍वकर्मा विद्यापीठ, सहप्रायोजक चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, मराठा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या शैक्षणिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते  तसेच दै. ‘पुढारी’चे सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर,  दै. ‘पुढारी’चे न्यूज ब्युरो चीफ हरीष पाटणे, जाहिरात विभागप्रमुख नितीन निकम,  इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. डॉ.  व्ही. व्ही. कुलकर्णी, करिअर मार्गदर्शक, पीसीईटी तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे प्रा. विजय नवले,विश्‍वकर्मा युनिव्हर्सिटीचे एचओडी प्रा. राधाकृष्ण बटुले, चाटे शिक्षण समुह सातारा विभागाचे राजेंद्र घुले,  पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाचे डॉ. व्ही. एन. गोहोकर, पुण्याच्या सूर्यदत्‍ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रा. गीता दिक्षीत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

श्‍वेता सिंघल म्हणाल्या, ‘पुढारी एज्यु दिशा’ हा अतिशय अभिनंदनीय असा उपक्रम आहे. दहावी तसेच बारावीनंतर काय करायचे? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही सतावत असतो. पण एकाच छताखाली नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये सुरु असलेल्या अनेक कोर्सेसची माहिती मिळणे हे सातार्‍यातील विद्यार्थ्यांचे मोठे भाग्य आहे. ‘पुढारी’ मार्फत केवळ माहितीच नव्हे तर करिअरसंबंधी मार्गदर्शन व समुपदेशनही केले जात आहे. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स न होता इतर क्षेत्रातील कोर्सेसकडेही लक्ष दिले पाहिजे. आवड असणार्‍या क्षेत्राला प्राधान्य दिले पाहिजे. केवळ चाकोरीबध्द शिक्षण न घेता त्यासोबत कौशल्यावर आधिरित शिक्षणही घेतले पाहिजे.

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर  रोजगार मिळवून देतील असे छोटे-मोठे कार्सेसही केले पाहिजेत. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बर्‍याच ठिकाणी संधी उपलब्ध होते. नोकरीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदराची भावना असली पाहिजे. सन्मान असला पाहिजे. तरच तुम्ही यशस्वी होवू शकाल. कोणतेही क्षेत्र निवडताना दैनंदिन अभ्यास बंद करु नका. तुमच्यासाठी अनेक पर्याय खुले राहिले पाहिजेत. समाजाशी संपर्क ठेवला तर रोजच्या समाजातील बदलाचे ज्ञान तुम्हाला होईल. पालक व गुरुजन तुमचे भविष्य चिंतत असतात. त्यांच्याइतकी काळजी समाजातील कुठलाच घटक घेवू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला पेलेल अशी विद्याशाखा निवडा. अभ्यासाबरोबरच एखादे साप्‍ताहिक, मासिकाचे वाचन ठेवा. सामान्य ज्ञान वाढवा.  ‘पुढारी एज्यु दिशा’मध्ये शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या शिक्षण संस्थांचे अनेक स्टॉल्स आहेत.  मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवू न शकणार्‍या पालकांनी त्यांच्या मुलांना किमान सातार्‍यात शिक्षण दिले पाहिजे,  असे आवाहनही श्‍वेता सिंघल यांनी केली. 

राजेंद्र मांडवकर म्हणाले, ‘पुढारी एज्यु दिशा’ची साखळी 13 वर्षांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा अशी सुरु झाली.  कोर्सेसच्या गर्दीत विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘पुढारी एज्यु दिशा’तून विद्यार्थ्यांना शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न आहे. कोणतीही विद्याशाखा निवडण्यापूर्वी संबंधित मान्यवरांच्या आयोजित व्याख्यानांचा लाभ घ्यावा.

हरीष पाटणे म्हणाले, सर्वाधिक खपाचे लोकप्रिय दैनिक असलेल्या ‘पुढारी’ने समाजावर नेहमीच गारुड केले आहे. ‘पुढारी’ने समाजातील कष्टकरी, शोषित, उपेक्षित घटकांचे प्रश्‍न अतिशय संवेदनशीलपणे हाताळले आणि सोडवले. दै. ‘पुढारी’चे  मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव तसेच व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेशदादा जाधव यांनी लोकहिताचे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले असून त्याचीच अंमलबजावणी आम्ही सातार्‍यात करत आहोत.  करिअर निवडताना विद्यार्थ्यांना अंधारात चाचपडावे लागत होते. अनेक पिढ्या याच अंधारात ठेचकाळल्या.   मार्गदर्शक, गुरु नसताना करिअरची वाट चोखाळता न आलेल्या बर्‍याचजणांच्या वाट्याला निराशा आली. या सर्व परिस्थितीचा विचार करुन नव्या पिढीला एकाच छताखाली सर्व कार्सेसची माहिती देण्यासाठी  ‘पुढारी एज्यु दिशा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.  दहावी तसेच बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करियरची वाट चोखाळण्यापूर्वी  ‘पुढारी एज्यु दिशा’तील  मातीचा गंध घेत आयुष्य सुगंधित करावे. सूत्रसंचलन जाहिरात प्रतिनिधी मयुरेश एरंडे यांनी केले. नितीन निकम यांनी आभार मानले.  यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांनी शिकवले वर्तमानपत्र कसे वाचायचे?

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आपल्या भाषणात ‘पुढारी’ हातात घेऊन विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल, तर वर्तमानपत्र वाचावेच लागेल, असा मंत्र दिला. ते सांगताना त्यांनी ‘पुढारी’चे प्रत्येक पान उलगडत पेपर कसा वाचायचा असतो, याचा तंत्रशुद्ध धडाच घालून दिला. प्रत्येकाने किमान अर्धा तास वृत्तपत्र वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र शेवटच्या पानापासून संपादकीय पानापर्यंत कशा पद्धतीने वाचले पाहिजे, हे सांगितले. 

प्रदर्शनातील आजची व्याख्याने 

11 ते 12 वाजता : करिअर पुढच्या पिढीचे (प्रा. राधाकृष्ण बटुले)
12 ते 1 :  इंटिरिअर डिझायनिंगमधील करिअरच्या उज्ज्वल संधी (प्रा. गीता दीक्षित)
4 ते 5  : 10 वी  व 12 वी नंतरच्या करिअर संधी  (डॉ. नितीन कदम)
5 ते 6  : आर्टस्, सायन्स, कॉमर्स व नवीन करिअरच्या संधी    (प्रा. राजेंद्र घुले)