सातारा : प्रतिनिधी
संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. भारावलेल्या वातावरणातील या प्रदर्शनस्थळी शैक्षणिक मेळाच भरला होता. विविध स्टॉलवर विद्यार्थ्यांनी अक्षरश: उड्या घेत करिअरच्या नवनव्या संधीचा शोध घेतला. गोंधळलेल्या व संभ्रमावस्थेत असलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी ‘वाटाड्या’ची भूमिका निभावणार्या या प्रदर्शनाने करिअरच्या नानाविध संधीचा जणू काही खजिनाच उलगडून दिला.
संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, पुणे, असोसिएट स्पॉन्सर्स विश्वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे. को-स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठावाडा मित्र मंडळ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ते 10 जून यादरम्यान ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या कार्यक्रमापासूनच विद्यार्थ्यांनी पोलिस करमणूक केंद्रात पालकांसह हजेरी लावली.
दहावीचा निकाल हाती घेवूनच अनेकजण या प्रदर्शनात सहभागी झाले होते. सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते या प्रदर्शनाला दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरूवात झाली. प्रदर्शनस्थळीचा माहोल काही औरच होता. उद्घाटनाची नियोजित वेळ सकाळी 11 ची होती. मात्र, 9 वाजल्यापासूनच विद्यार्थी व पालकांचा ओघ सुरू झाला होता. पोलिस करमणूक केंद्रातील अलंकार हॉल व परिसर ‘पुढारी’ एज्यु दिशासाठी सज्ज झाला होता. करमणूक केंद्राच्या प्रवेशद्वाराला प्रदर्शनाची देखणी स्वागत कमान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अलंकार हॉलमधील सहभागी संस्थांचे स्टॉल, व्याख्यानमाला हॉल यांना तर कॉर्पोरेट लूक प्राप्त झाला आहे. दिवसभर प्रदर्शनस्थळी विद्यार्थ्यांची व पालकांचीही मोठी वर्दळ झाली. येणारा प्रत्येकजण स्टॉलवर जावून माहिती घेत होता. त्यानंतर व्याख्यान हॉलमध्ये उपस्थिती लावून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेताना पहायला मिळाले. ही पर्वणी अजूनही दोन दिवस असून त्याद्वारे आज व उद्या आणखी खूप शैक्षणिक खजिना उपलब्ध होणार आहे.